( चिपळूण /प्रतिनिधी )
चिपळूणच्या ऐश्वर्या रश्मी रवींद्र जाधव हिने अमेरिकेतील डी पॉल युनिव्हर्सिटी (DePaul University) मधून सायबर सिक्युरिटी (Cyber Security) या अत्याधुनिक विषयात मास्टर्स डिग्री प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली असून नुकताच तिचा पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ऐश्वर्या ही पाग बौद्ध कॉलनी, चिपळूण येथील रहिवासी असून तिचे वडील रवींद्र जाधव हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे वाहतूक नियंत्रक अधिकारी आहेत. ऐश्वर्याचे शालेय शिक्षण ख्रिस्त ज्योती हायस्कूल, चिपळूण, सिक्रेट हार्ट हायस्कूल, रत्नागिरी आणि फातिमा हायस्कूल, अंबरनाथ येथे झाले. त्यानंतर तिने सिद्धार्थ कॉलेज, मुंबई येथून बारावी सायन्स उत्तीर्ण केली.
त्यानंतर सिंहगड कॉलेज, लोणावळा येथून तिने कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. आपली शैक्षणिक वाटचाल अधिक सक्षम करण्यासाठी तिने अमेरिकेतील डी पॉल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला आणि सायबर सिक्युरिटीसारख्या स्पर्धात्मक व जागतिकदृष्ट्या महत्त्वाच्या क्षेत्रात मास्टर डिग्री मिळवली.
तिच्या या शैक्षणिक प्रगतीबद्दल अनेक मान्यवरांनी व शिक्षणप्रेमींनी तिला शुभेच्छा दिल्या असून, चिपळूणच्या या कन्येने जागतिक स्तरावर नावलौकिक मिळविल्याने तिच्या पालकांसह संपूर्ण परिसरात अभिमानाची भावना व्यक्त केली जात आहे. तिच्या पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.