(चिपळूण)
कोकणातील पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करणाऱ्या लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाविरोधात जनतेचा संताप अधिक तीव्र झाला आहे. प्रदूषणकारी रासायनिक कंपन्यांविरोधात पुकारलेले बेमुदत आंदोलन सलग दुसऱ्या दिवशीही सुरू असून, “कर्करोगाच्या विळख्यातून वाचवा” अशी आर्त हाक आंदोलकांनी दिली आहे. ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार शेतकरी, बागायतदार आणि पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला आहे.
ग्रीन वर्ल्ड फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र आंब्रे यांनी आंदोलनस्थळी बोलताना लोटे एमआयडीसीमधील प्रदूषणाचे भयावह वास्तव उघड केले. गेल्या साडेतीन दशकांपासून औद्योगिक कंपन्यांकडून हवेत विषारी वायू सोडले जात असून, सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन नसल्याने भूजलसाठेही दूषित झाल्याचा आरोप त्यांनी केला. विशेषतः रात्रीच्या वेळी सोडल्या जाणाऱ्या उग्र वायूमुळे नागरिकांना श्वसनास त्रास होत असून, परिसरातील अनेक घरांमध्ये कर्करोगासारखे गंभीर आजार वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. हा विकास नसून स्थानिक जनतेच्या जीवाशी खेळ असल्याचे सांगत, लोकांच्या आरोग्यावर बेतणारा कोणताही रोजगार स्वीकारार्ह नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
शेतकरी कष्टकरी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनामुळे प्रशासन आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या कंपन्यांवर तात्काळ बंदी घालावी, दोषी कारखानदारांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच लोटे परिसरातील नागरिकांची तातडीने सर्वंकष आरोग्य तपासणी करावी, अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.
लोटे औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणाचा प्रश्न आता संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेत असून, या गंभीर मुद्द्यावर शासन कोणती ठोस भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

