(रत्नागिरी)
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या रत्नागिरी ते पंढरपूर या सायकलवारीला प्रतिपंढरपूर श्री विठ्ठल मंदिरातून प्रारंभ झाला. काकड आरती, मंदिरातील प्रसन्न वातावरण, राम कृष्ण हरी नामगजर, मध्येच पडणारा रिमझिम पाऊस, सायकलला लावलेला भगवा ध्वज, सायकलिस्ट क्लबची निळ्या रंगाचा उठून दिसणारा टी शर्ट यामुळे सायकलवारीची सुरवात उत्साहात झाली.
विठ्ठल मंदिरामध्ये पहाटे काकड आरती झाल्यानंतर सायकलस्वारांना देवस्थानतर्फे श्रीफळ, पुष्प व प्रसाद देऊन आणि गाऱ्हाणे घालून आशीर्वाद देण्यात आला. रत्नाकर हेगिष्टे यांनी विठुरायाला गाऱ्हाणे घातले. विठ्ठल मंदिर देवस्थानचे विजय पेडणेकर, प्रमोद रेडीज, वारकरी रवी गुरव यांनी सायकलवारीला झेंडा दाखवला. याप्रसंगी काकड आरतीसाठी नेहमी येणारे भाविक मोहन चंदरकर, चंद्रशेखर घडशी, रोहन शिर्के, उदय डाफळे, रत्नाकर हेगिष्टे, वसुधा शिर्के, स्मिता सनगरे, सौ. अक्षया रेडिज आदी उपस्थित होते.
रत्नागिरी ते पंढरपूर हा ३०० किलोमीटरचा प्रवास हे सायकल वारकरी दोन दिवसांत पूर्ण करणार आहेत. २२ जूनला भागवत एकादशीच्या दिवशी राज्यभरातील वारकरी सायकल रिंगण सोहळा आणि संमेलन करणार आहेत. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे महेश सावंत, विशाल भोसले, गजानन भाताडे, नारायण पाटोळे, अमित पोटफोडे, आरती दामले, राकेश होरंबे, विकास कांबळे, अक्षय पोटफोडे आणि विवेक खानविलकर हे सदस्य वारीमध्ये सहभागी झाले आहेत.
आज हे सायकलपट्टू मलकापूर, कराड मार्गे उंब्रज येथे मुक्काम करणार आहेत. उद्या (ता. २१) सकाळी मायणी, महूदमार्गे पंढरपूरला मुक्काम होईल. २२ ला भागवत एकादशीला सायकल रिंगण व सायकल संमेलन होईल. गेल्या चार वर्षांपासून सायकलवारी सुरू आहे. यंदा लातूर सायकल क्लबकडे आयोजनाची जबाबदारी आहे. प्रत्येक वर्षी पंढरपूर सायकल क्लब सर्व सायकलिस्टना सहकार्य करत आहे.
आम्ही या वर्षी १० जण रत्नागिरी-पंढरपूर सायकलवार करत आहोत. सायकलने जायचे हे पहिलेच वर्ष आहे. वारीला पाठिंबा देणारे सदस्य आमच्यासोबत हातखंबा, पालीपर्यंत आले. यामुळे आमचा उत्साह वाढला आहे. विठुरायाचा गजर करत वारी पूर्ण करू
– नारायण पाटोळे
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबमुळे मला सायकलवारी करण्याची संधी मिळाली. हा नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणावा लागेल. आज रत्नागिरीतील विठ्ठल मंदिरातून विठुरायाचे दर्शन घेऊन सायकल वारीला सुरवात केली
– अमित पोटफोडे