(संगमेश्वर / वार्ताहर)
नदीपात्रातील बंधाऱ्याजवळ मासेमारीसाठी गेलेल्या प्रकाश अर्जुन गेल्ये (वय ५४, रा. काटवली, ता. संगमेश्वर) यांचा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. आज (बुधवारी) दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे काटवली गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, प्रकाश गेल्ये हे नेहमीप्रमाणे गावातील नदीपात्रात बांधलेल्या बंधाऱ्याजवळ मासेमारी करण्यासाठी गेले होते. यावेळी पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते खोल डोहात बुडाले. पाण्यातून बाहेर पडण्याची संधी न मिळाल्याने त्यांचा गुदमरून जागीच मृत्यू झाला.
या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर शोधमोहीम राबवून त्यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. या घटनेची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस पुढील कायदेशीर तपास करत आहेत.
नदीपात्रात किंवा बंधाऱ्यांच्या परिसरात मासेमारीसाठी जाणाऱ्या नागरिकांनी पाण्याची पातळी आणि खोली यांचा अंदाज घेऊन स्वतःच्या सुरक्षेची योग्य खबरदारी घ्यावी, असे आवाहन ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


