(जैतापूर / राजन लाड)
जैतापूर पोस्ट कार्यालयाचे प्रमुख आणि ग्राहकांचे लाडके पोस्टमास्तर श्री. परांजपे यांची बदली वडापेठ आडीवरे येथे झाली आहे. जुलै 2022 पासून मे 2025 पर्यंत त्यांनी जैतापूर येथे कार्यरत राहून अत्यंत ग्राहकाभिमुख, विनम्र आणि हसतमुख सेवा दिली.
जैतापूर परिसरात वारंवार कोसळणारी इंटरनेट सेवा, यंत्रणेत येणाऱ्या अडचणी, सीमित साधनसंपत्ती अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी दिलेल्या सौजन्यपूर्ण व तत्पर सेवेचे गावकऱ्यांनी विशेष कौतुक केले. त्यांच्या कार्यशैलीने प्रत्येक ग्राहकाला वेळेवर मदत, पारदर्शक व्यवहार आणि आपुलकीची वागणूक मिळवून दिली.
बदलीच्या निमित्ताने जैतापूर पोस्टातील सहकारी कर्मचारी, बँक कर्मचारी व ग्रामस्थांच्या वतीने श्री. परांजपे यांना निरोप देण्यात आला. यावेळी ग्रामस्थ, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांनीही श्री. परांजपे यांना पुढील सेवेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, “परांजपे यांच्यासारखे सेवाभावी अधिकारी ही ग्रामीण भागाची खरी ताकद आहेत.”
शुभेच्छा समारंभानंतर उपस्थितांनी त्यांच्या भावी वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त करत जैतापूरमधील त्यांचा कार्यकाल संस्मरणीय ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.