(रत्नागिरी / वार्ताहर)
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने विमुक्त जाती व भटक्या जमाती (वि.जा.भ.ज.) आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रज्ञाशोध परीक्षा २०२६’मध्ये यश संपादन करणाऱ्या चार गुणवंत विद्यार्थिनींचा जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त तसेच ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिना’च्या निमित्ताने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
या परीक्षेत माध्यमिक आश्रमशाळा जावडे येथील इयत्ता सातवीतील रीना जाधम आणि इयत्ता नववीतील आयुषी महाडीक, तसेच माध्यमिक आश्रमशाळा निवे येथील इयत्ता सातवीतील ईश्वरी पेढांरे आणि इयत्ता नववीतील स्वरा गोपाळ यांनी यश मिळविले. या सर्व विद्यार्थिनींना जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
या वेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक उदयसिंह गायकवाड, इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी अपूर्वा कारंडे, हेरिटेज संस्था लांजाच्या संस्थाचालक तथा माजी पंचायत समिती सभापती ॲड. अपर्णा पवार, संतोष कांबळे, दलित सेवा संस्था निवे बुद्रुकचे मुख्याध्यापक विजय पाटील, शिक्षक नामदेव पाटील आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या इयत्ता सातवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांना सांख्यिकी (संख्याशास्त्र) विषयाची आवड निर्माण व्हावी, तसेच स्पर्धात्मक युगात विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी त्यांच्यात आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन करण्यात आल्याचे इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी अपूर्वा कारंडे यांनी सांगितले. जिल्ह्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारची प्रज्ञाशोध परीक्षा आयोजित करण्याचा हा कोकण विभागासह संपूर्ण महाराष्ट्रातील पहिलाच अभिनव उपक्रम ठरला आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुंबई विभागाचे प्रादेशिक उपसंचालक दिलीप राठोड यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी अपूर्वा कारंडे यांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची माहिती देत शिक्षणाचे महत्त्व विशद केले. दैनंदिन जीवनातील संख्याशास्त्राचे महत्त्व तसेच भविष्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, याबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी साधला विद्यार्थिनींशी संवाद
आश्रमशाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी कोकण विभागातील आश्रमशाळांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक केले. या आश्रमशाळा आज केवळ स्थानिकच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध करून देणारी प्रमुख केंद्रे ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांनी पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
संवादादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी स्वरा, रीना, आयुषी आणि ईश्वरी यांच्याशी चर्चा करून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती घेतली. विद्यार्थ्यांना घडविणे, त्यांच्यावर योग्य संस्कार करणे, त्यांच्यासमोर आदर्श ठेवणे आणि शिक्षणासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देणे ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. अशा वातावरणामुळे मुलांचा सर्वांगीण आणि बौद्धिक विकास होतो, असे मत जिल्हाधिकारी जिंदल यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी शिक्षकांच्या योगदानाचाही गौरव केला.
१२ जिल्ह्यांतील विद्यार्थी शिक्षणासाठी कोकणातील आश्रमशाळांमध्ये
पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत कोकण विभागात आश्रमशाळांची संख्या मर्यादित असली, तरी असोंडे, दाभोळे आणि अन्य माध्यमिक आश्रमशाळांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या दर्जेदार शिक्षणामुळे आणि सुविधांमुळे राज्याच्या विविध भागांतील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत आहेत. पुणे, वर्धा, नांदेड यांसारख्या राज्यातील तब्बल १२ जिल्ह्यांमधील विद्यार्थी कोकणात येऊन १० ते १२ वर्षे वास्तव्य करतात आणि आपले शालेय शिक्षण पूर्ण करतात. ही बाब संपूर्ण कोकण विभागासाठी अभिमानास्पद असल्याचे माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक विजय पाटील, हेरिटेज संस्था लांजाच्या ॲड. अपर्णा पवार आणि संतोष कांबळे यांनी नमूद केले.


