(कोल्हापूर)
पुरोगामी विचारांची भूमी समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात भानामती व काळ्या जादूचे प्रकार सातत्याने समोर येत असून, शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील वैकुंठधाम परिसरात अशाच एका अघोरी प्रकाराची गंभीर घटना समोर आली आहे. एका महिला आणि पुरुषाकडून भरदिवसा नग्न होऊन भानामती व करणीचे प्रकार केल्याचे सीसीटीव्ही फुटेजद्वारे उघड झाले आहे. या प्रकारामुळे उदगाव व जयसिंगपूर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
जयसिंगपूर येथील एका ज्येष्ठ नागरिकाच्या निधनानंतर त्यांचे अंत्यसंस्कार उदगाव येथील वैकुंठधाममध्ये करण्यात आले. रक्षा विसर्जनाच्या दिवशी नातेवाईक पुन्हा स्मशानभूमीत पोहोचले असता, अंत्यसंस्काराच्या ठिकाणी रक्षा बाजूला करून काळी बाहुली, नारळ, आणि एक नावाची चिठ्ठी ठेवलेली आढळून आली. या घटनेमुळे नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या प्रकारानंतर नातेवाईकांनी उदगाव ग्रामपंचायतीकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. तपासणीदरम्यान एका पुरुष व महिलेकडून विविध वेळी स्मशानभूमीत नग्न होऊन अघोरी पूजा व करणीचे प्रकार केल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, ही पूजा अमावस्या, पौर्णिमा, शनिवार व बुधवार अशा विशेष दिवशी भरदिवसा केली जात असल्याचे फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसते.
सध्या ग्रामपंचायतीकडून या घटनांचा गांभीर्याने तपास सुरू असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक ती उपाययोजना तातडीने करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले आहे. तसेच पोलिस प्रशासनालाही याबाबत माहिती देण्यात आली असून, पुढील कायदेशीर कारवाईची तयारी सुरू आहे. या घटनेमुळे अंधश्रद्धेचे वास्तव पुन्हा एकदा समाजासमोर आले असून, भानामती व काळी जादूसारख्या कुप्रथांविरोधात जनजागृती आणि कठोर कारवाईची गरज अधोरेखित झाली आहे.