(जळगाव)
राज्याचे मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन यांच्या नावाने सोशल मीडियावर काही कथित आक्षेपार्ह छायाचित्रे व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, प्राथमिक तपासात ही छायाचित्रे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आली असावीत किंवा मॉर्फ करण्यात आली असावीत, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका फेसबुक खात्यावरून मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचविण्याच्या उद्देशाने कथितरित्या AI-आधारित अथवा मॉर्फ केलेली छायाचित्रे प्रसारित करण्यात आली. प्राप्त तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 356, 3(5) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम 66(C) आणि 67 अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
सायबर पोलिसांकडून संबंधित सोशल मीडिया खाते, पोस्टचा मूळ स्रोत आणि ती तयार करून प्रसारित करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी डिजिटल पुरावे गोळा करण्यात येत असून संपूर्ण नेटवर्कची तपासणी केली जात आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सतीश गोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
दरम्यान, या छायाचित्रांमुळे राज्यातील राजकीय वातावरणही तापले आहे. काही विरोधी पक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी संबंधित पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्याने या प्रकरणाला राजकीय रंग चढल्याचे दिसून येत आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनीदेखील या संदर्भात पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केल्याची माहिती दिली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ते पुढे म्हणाले, हा फोटो पूर्णपणे मॉर्फ केलेला आहे. तो नेमका कसा तयार करण्यात आला याची मला माहिती नाही. तपासातून सत्य समोर येईल आणि त्यानंतर आपण या विषयावर सविस्तर भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, AI तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरासोबत त्याचा गैरवापर करून बनावट छायाचित्रे आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याबद्दल सायबर तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर दिसणारी कोणतीही माहिती अथवा छायाचित्रे पडताळणी केल्याशिवाय शेअर करू नयेत, असे आवाहन सायबर पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
या प्रकरणातील आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

