(मुंबई/दिल्ली)
पीडित विद्यार्थ्यांकडून गंभीर लैंगिक शोषणाचे आरोप लागलेल्या चैतन्यानंद स्वामी यांच्याविरुद्ध धक्कादायक खुलासे होत आहेत. दिल्ली पोलिसांनी स्वामी यांना उत्तर प्रदेशातील आग्रा येथून अटक केली असून, आता त्यांना रिमांडवर घेऊन तपास सुरू आहे.
पोलिसांच्या तपासात चैतन्यानंद स्वामी यांच्या वसंत कुंज येथील शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट अँड रिसर्च संस्थेतून सापडलेल्या पुराव्यांमध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. शोधमोहिमेदरम्यान पोलिसांना सेक्स टॉईज, पाच अश्लील सीडीज आणि बनावट छायाचित्रे जप्त झाली. या छायाचित्रांमध्ये स्वामींनी स्वतःचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि एका ब्रिटिश नेत्यासोबत बनावट चित्रण केले होते, जे त्यांनी संस्थेत सार्वजनिक करून आपला प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न केला होता.
पोलिसांनी खुलासा केला की, चैतन्यानंद स्वामी शिष्यवृत्तीच्या नावाखाली आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला विद्यार्थ्यांना प्रवेश देत होते आणि त्यांना अश्लील संदेश पाठवणे, शारीरिक संबंधासाठी दबाव आणणे, नकार दिल्यास पदवी रोखण्याची धमकी देत होते.
दिल्ली पोलिसांच्या तपासात स्वामी यांच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले असून, बागेश्वर आणि अल्मोडासह इतर ठिकाणी देखील त्यांचा मागोवा घेतला गेला. पोलिसांनी सांगितले की, दिवसेंदिवस प्रकरणातील धक्कादायक खुलासे समोर येत आहेत आणि तपास अजूनही सुरू आहे.

