ल(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील बेहेरेवाडी, मेर्वी येथे गणपती सणादरम्यान दुर्दैवी घटना घडली असून सतिश सखाराम पुजारी (वय ५१, रा. विलेपार्ले, मुंबई) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सतिश पुजारी हे २४ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता गणपती सणासाठी नातेवाईकांच्या घरी बेहेरेवाडी, मेर्वी येथे आले होते. २७ ऑगस्ट रोजी गणपती स्थापनेच्या कार्यक्रमानंतर दुपारी साडेबारा वाजता ते घरातून कोणालाही न सांगता बाहेर पडले. बराच वेळ होऊनही ते परत न आल्याने घरच्यांनी व गावकऱ्यांनी शोध सुरू केला. शोधादरम्यान ते काळीकोंड येथील आंब्याच्या बागेजवळील वाहत्या पाण्याच्या पात्रात उपड्या अवस्थेत आढळून आले.
तत्काळ त्यांना खासगी रुग्णवाहिकेतून पावस प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटल, रत्नागिरी येथे हलवण्यात आला. प्राथमिक अहवालानुसार त्यांचा मृत्यू पाण्यात बुडल्याने झाला आहे. ही घटना २८ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता पोलिसांत नोंदवण्यात आली असून, आमृ. क्रमांक २४/२०२५ बी.एन.एस.एस. १९४ अंतर्गत तपास सुरू आहे.
प्राथमिक तपासात ही घटना अपघाती असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पाण्याच्या पात्राजवळ गेल्यावर सतिश यांचा तोल जाऊन ते पडले असावेत, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. या घटनेमुळे गणपती सणात गावात शोककळा पसरली आहे.

