(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा मानला जाणारा मालगुंड–गणपतीपुळे सागरी मार्ग सध्या कचऱ्याच्या विळख्यात सापडल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून या मार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात कचरा साचत असल्याने परिसरातील पर्यटन सौंदर्यावर परिणाम होत असून स्थानिक नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने पर्यटकांची ये-जा होत असते. गणपतीपुळे आणि मालगुंडसह जयगड पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठी हा महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. तसेच स्थानिक ग्रामस्थांचीही दैनंदिन वाहतूक याच रस्त्यावरून होत असल्याने हा मार्ग रहदारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
मात्र अलीकडे या मार्गाच्या दुतर्फा कचऱ्याचे ढिगारे साचलेले दिसत असून त्यामुळे दुर्गंधीची समस्या निर्माण होत आहे. परिसरातील काही अज्ञात व्यावसायिकांकडून कचरा येथे आणून टाकला जात असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. याबाबत योग्य ती चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रश्नाबाबत मालगुंड ग्रामपंचायतीच्या काही मागील ग्रामसभांमध्येही चर्चा झाली होती. त्या वेळी रस्त्याच्या कडेला कचरा टाकू नये, असे आवाहन करणारे फलकही लावण्यात आले होते. मात्र सध्या ते फलक दिसत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पर्यटनस्थळाच्या दृष्टीने महत्त्व असलेल्या या मार्गावरील वाढत्या कचऱ्याच्या समस्येकडे मालगुंड ग्रामपंचायतीने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

