(रत्नागिरी /प्रतिनिधी)
आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या इंधनटंचाईचे पडसाद आता जिल्ह्यातील छोट्या हॉटेल व्यवसायांवर उमटू लागले आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक टपरीधारक आणि लहान हॉटेलचालकांना व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे, तर काहींचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय संघर्षामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला असून, देशांतर्गत गॅस टंचाई तीव्र झाली आहे. घरगुती गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शासनाने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या विक्रीवर निर्बंध घातल्याने हॉटेल व्यवसायिकांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. रोजच्या व्यवहारासाठी लागणारा गॅस मिळवणे कठीण बनले असून, अनेकांनी पर्यायी उपाय शोधण्यास सुरुवात केली आहे. छोट्या व्यावसायिकांची स्थिती अधिक बिकट आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात झालेली प्रचंड वाढ आणि मर्यादित उपलब्धता यामुळे त्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. शासनाने अत्यावश्यक सेवांसाठीच गॅस पुरवठा करण्याचे निर्देश दिले असून, हॉटेल व्यवसायासाठी केवळ ४० टक्के साठा राखून ठेवण्याची अट घातली आहे. परिणामी, या साठ्यातून गॅस मिळण्याची प्रतीक्षा किती काळ करावी लागणार, हा प्रश्न उद्भवला आहे.
परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी काही मोठ्या हॉटेलांनी पारंपरिक चुलीचा वापर सुरू केला असून, इंडक्शनसारख्या पर्यायांकडेही वळण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, चहाच्या टपऱ्या, चायनीज स्टॉल्स आणि रस्त्यालगतच्या ढाब्यांसाठी हे पर्याय व्यवहार्य ठरत नाहीत. परिणामी, अनेक छोट्या हॉटेल्सना शटर खाली करावे लागले असून, रस्त्यांवर बंद पडलेल्या टपऱ्यांचे चित्र दिसू लागले आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने रत्नागिरी आणि चिपळूण शहरांमध्ये पीएनजी जोडणीसाठी आवाहन केले आहे. काही मोठ्या हॉटेल्सनी यापूर्वीच पीएनजीचा पर्याय स्वीकारल्याने त्यांचा व्यवसाय तुलनेने स्थिर आहे. मात्र, भाड्याच्या जागेत असलेल्या छोट्या हॉटेलांना जागामालकांकडून परवानगी मिळत नसल्याने हा पर्यायही अनेकांसाठी बंद आहे. एकूणच, गॅस टंचाईमुळे निर्माण झालेल्या या संकटातून मार्ग काढण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत असून, परिस्थिती सुधारण्याची प्रतीक्षा हॉटेल व्यावसायिकांना लागून राहिली आहे.

