(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर येथील खातू कुटुंबातील बहीण-भावाने वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. डॉ. श्रिया आकाश रेडीज (खातू) यांनी बाल व प्रतिबंधात्मक दंतचिकित्सा या विषयात मास्टर ऑफ डेंटल सर्जरी (एम.डी.एस.) ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. तर त्यांचे बंधू डॉ. प्रसाद खातू यांची चिपळूण येथील कॉलेज ऑफ जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या (सीजीपीए) सन २०२६-२७ या वर्षासाठी अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. संगमेश्वरमधील पहिल्या महिला एम.डी.एस. डॉक्टर होण्याचा मान डॉ. श्रिया यांना मिळालाआहे. या दोघांच्या यशामुळे संगमेश्वर आणि चिपळूण परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संगमेश्वरमधील ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. प्रदीप खातू आणि डॉ. प्रीती खातू यांच्या कन्या डॉ. श्रिया यांनी बाल व प्रतिबंधात्मक दंतचिकित्सा या विशेष शाखेत उच्च पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. बालवयात दातांचे आरोग्य जपणे, दंतविकारांना प्रतिबंध करणे, आजारांचे वेळीच निदान करणे आणि मुलांमध्ये दंतआरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, या दृष्टीने या शाखेला विशेष महत्त्व आहे. आई-वडिलांचे मार्गदर्शन, वैद्यकीय सेवेचे संस्कार आणि शिक्षणाप्रती असलेली निष्ठा यांच्या बळावर त्यांनी हे यश संपादन केले आहे.
संगमेश्वरमध्ये घडलेल्या डॉ. श्रिया यांनी उच्च शिक्षणाच्या माध्यमातून मिळवलेले हे यश तालुक्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. त्यांच्या यशामुळे वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या तरुणींना प्रेरणा मिळणार आहे. डॉ. श्रिया यांचे माहेर संगमेश्वर येथे असून सासर चिपळूण येथे आहे. त्या चिपळूण येथील प्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. प्रसाद खातू यांच्या भगिनी आणि श्री. वैभव नथुराम रेडीज यांच्या स्नुषा आहेत.
दरम्यान, संगमेश्वरचे सुपुत्र आणि चिपळूण येथील सुश्रुषा रुग्णालयाचे मूळव्याध व पोटविकार तज्ज्ञ डॉ. प्रसाद खातू यांच्यावर आता ‘सीजीपीए’च्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. चिपळूण येथील हॉटेल तेज ग्रँड येथे आयोजित विशेष बैठकीत त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली. सुश्रुषा रुग्णालयाच्या माध्यमातून त्यांनी रुग्णसेवेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अध्यक्ष म्हणून काम करताना वैद्यकीय क्षेत्रातील समन्वय वाढवणे, डॉक्टरांमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण घडवून आणणे आणि आरोग्यविषयक उपक्रमांना चालना देणे, या दृष्टीने त्यांच्या नेतृत्वाकडे अपेक्षेने पाहिले जात आहे.
या बहीण-भावाच्या दुहेरी यशानिमित्त संगमेश्वरमधील नावडी येथे मान्यवरांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते तथा निनावी देवी प्रासादिक मंडळाचे अध्यक्ष व मानकरी दत्ताराम (बावा) सुर्वे, गौरव सुर्वे, प्रमोद वसंत खातू, प्रियंका खातू, माजी सरपंच नम्रता शेट्ये आणि विकास शेट्ये यांनी डॉ. श्रिया आणि डॉ. प्रसाद यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. या वेळी अभिजित कोळपे, दीपक बगाडे, सिद्धेश पिलणकर, विनोद मुळ्ये, दिनेश आंब्रे यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी दोन्ही डॉक्टरांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
डॉ. प्रदीप खातू आणि डॉ. प्रीती खातू यांनी अनेक वर्षे रुग्णसेवेच्या माध्यमातून समाजात विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. त्यांच्या वैद्यकीय सेवेचा वारसा पुढे नेत डॉ. श्रिया आणि डॉ. प्रसाद यांनी आपापल्या क्षेत्रात मिळवलेले यश कुटुंबासह संपूर्ण संगमेश्वर तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरले आहे. आई-वडिलांचे संस्कार, शिक्षणासाठी मिळालेले मार्गदर्शन आणि रुग्णसेवेचा आदर्श या दोन्ही डॉक्टरांच्या यशामागील महत्त्वाचे घटक असल्याची भावना व्यक्त होत आहे.
दोन्ही डॉक्टरांचा सन्मान करताना त्यांच्या आई-वडिलांच्या योगदानाचाही गौरव होत असल्याचे दत्ताराम (बावा) सुर्वे यांनी सांगितले. मुलांना उच्च शिक्षण देऊन स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सक्षम बनविण्याचा आदर्श डॉ. प्रदीप आणि डॉ. प्रीती खातू यांनी घालून दिला आहे. नव्या पिढीने अशा कुटुंबांचा आदर्श घ्यावा आणि दोन्ही डॉक्टरांनी भविष्यातही रुग्णसेवेतून समाजासाठी मोलाचे योगदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
गौरव सुर्वे यांनीही या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. डॉ. प्रदीप आणि डॉ. प्रीती खातू यांनी रुग्णसेवा करताना जपलेली निष्ठा, सेवाभाव आणि रुग्णांप्रती असलेली आपुलकी हीच त्यांच्या मुलांसाठी प्रेरणा ठरली आहे. डॉ. श्रिया यांनी मिळवलेली एम.डी.एस. पदवी आणि डॉ. प्रसाद यांची ‘सीजीपीए’च्या अध्यक्षपदी झालेली निवड ही त्यांच्या मेहनतीची पावती आहे. गावातील गुणवंतांचा सन्मान केल्याने त्यांच्या कार्याचा गौरव होतो आणि नव्या पिढीला शिक्षण, जिद्द व कर्तृत्वाची प्रेरणा मिळते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.


