(संगमेश्वर / एजाज पटेल)
गणपतीपुळे येथून कोपरखैरणेच्या दिशेने निघालेल्या एका खासगी ट्रॅव्हल बसचा रविवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास तुरळ फाटा परिसरात भीषण अपघात झाला. एमएच ४३ सी ई ४२९३ क्रमांकाची ही ट्रॅव्हल बस एमएच १२ डब्ल्यू जे ४७५१ क्रमांकाच्या डंपरला मागून धडकली. या अपघातात बसचे पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बसचालकासह काही प्रवासी जखमी झाले आहेत.
अपघाताची घटना अशी घडली की, डंपर कडवई गावाच्या दिशेने वळत असताना मागून भरधाव वेगात आलेल्या ट्रॅव्हल बसने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे बसचा समोरील भाग अक्षरशः चुरडून गेला असून, अनेक प्रवासी क्षणभर हादरून गेले.
अपघाताच्या आवाजाने परिसरातील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने बसमधून बाहेर काढले. काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून, बसचालक व एका प्रवाशास गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते. त्यांना पुढील उपचारासाठी चिपळूण येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
घटनास्थळी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस व स्थानिक प्रशासन यांनी तत्काळ घटनास्थळी हजर राहून वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले. या अपघातामुळे प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक माहितीनुसार बसचालकाचा वेगावर नियंत्रण नसणे व डंपरच्या वळणाच्या क्षणी अंतर न ठेवणे हे कारण असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पोलीस अधिक तपास करत असून, दोन्ही वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. अपघातग्रस्त बस ही गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची असल्याची माहिती आहे. या अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली आहे. मात्र अशा प्रकारच्या अपघातांमुळे महामार्गावरील वाहतूक सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.