( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
रत्नागिरी जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदाची सूत्रे आता एका दमदार आणि कर्तबगार अधिकाऱ्याच्या हाती येणार आहेत. सध्याचे पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी आयपीएस नितीन बगाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्या कर्तृत्वामुळे दबंग अधिकारी म्हणून ओळख निर्माण केलेले बगाटे यापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस उपायुक्त (शहर) म्हणून कार्यरत होते.
हिंगोली जिल्ह्यातील निशाणा या लहानशा गावात जन्मलेल्या बगाटे यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. सुरुवातीला शिक्षकाची भूमिका निभावणाऱ्या बगाटे यांनी आयआयटीतून उच्च शिक्षण घेतल्यानंतर काही काळ पुण्यात खासगी क्षेत्रात नोकरी केली. मात्र, समाजसेवेची ओढ त्यांना थेट आयपीएस सेवेकडे घेऊन गेली.
२०१८ ते २०२० या कालावधीत परभणीत प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी व सहायक पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी आपले पहिले पाऊल पोलीस सेवेत टाकले. त्यानंतर चंद्रपूर, सिंधुदुर्ग व छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी अत्यंत परिणामकारक कामगिरी बजावली. विशेष म्हणजे सिंधुदुर्गचे अपर पोलिस अधीक्षक असताना त्यांनी कोकणातील कार्यपद्धतीचा सखोल अनुभव घेतला आहे, जो आता रत्नागिरीत त्यांच्या कामास निश्चितच उपयोगी ठरेल.
कोकणात कायदा व सुव्यवस्थेचा बगाटे यांचा अनुभव आणि त्यांची निर्णयक्षमता पाहता, रत्नागिरी जिल्ह्यात गुन्हेगारीवर वचक बसवण्यात त्यांचा ठसा उमटणार यात शंका नाही. आता नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या असून, रत्नागिरीत नवे युग सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.