( रत्नागिरी / वार्ताहर )
स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने आपल्या स्थापनेपासूनच्या ३५ वर्षांच्या प्रवासात सहकार क्षेत्रातील अर्थविश्वात प्रभावी आणि विश्वासार्ह स्थान निर्माण केले आहे. स्थापनेच्या वेळी अवघे ३०० सभासद, तालुका कार्यक्षेत्र आणि १० हजार रुपयांचे भागभांडवल अशी सुरुवात असलेल्या या संस्थेने आज ५० हजार सभासदांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. सभासदांचा विश्वास, सहभाग आणि सहयोग यांच्या बळावर संस्थेने आपला कार्यविस्तार शहरापासून ग्रामीण भागापर्यंत केला असून ७६० कोटी रुपयांचा संमिश्र व्यवसाय उभा केला आहे, अशी माहिती स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
३०० सभासदांपासून सुरू झालेला हा प्रवास आता ५० हजार सभासदांच्या सर्वसमावेशक अर्थकुटुंबापर्यंत पोहोचला आहे. ५० हजार सभासदांना आर्थिक सेवा देताना संस्थेने आपल्या १७ शाखांच्या माध्यमातून विश्वासार्ह आणि अचूक आर्थिक सेवा देण्याची परंपरा यशस्वीपणे कायम ठेवली आहे. सभासदांचा सहभाग आणि सहयोग यामुळे संस्थेचे अर्थविश्व अधिक व्यापक आणि सक्षम झाले असल्याचे ॲड. पटवर्धन यांनी सांगितले.
तालुका कार्यक्षेत्रापासून जिल्हा आणि त्यानंतर राज्य कार्यक्षेत्रापर्यंत संस्थेने केलेल्या विस्तारामुळे स्वरूपानंद पतसंस्थेच्या कार्याचा व्याप वाढला आहे. या विस्तारासोबतच भागधारक सभासदांचा विश्वास संपादन करत ५० हजार सभासदांचे स्वरूप अर्थकुटुंब संस्थेने साकारले आहे, असे ॲड. पटवर्धन यांनी नमूद केले.
५० हजार सभासदांच्या सदिच्छा, स्नेह, विश्वास आणि सहभागाच्या संगमातून स्वरूपानंद पतसंस्था आपले अर्थकारण अधिक मजबूत करत आहे. कोणत्याही आर्थिक संस्थेसाठी तसेच तिच्या सभासदांसाठी हा टप्पा अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
आर्थिक निकष, आकडेवारी आणि प्रमाणबद्धता कायम राखतानाच सभासदांचा आत्मसन्मान वाढावा, त्यांची आर्थिक उन्नती व्हावी, सामाजिक बांधिलकी जपली जावी आणि नवयुवकांनाही योग्य सहभागाची संधी मिळावी, यासाठी स्वरूपानंद पतसंस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. हे प्रयत्न यशस्वी होत असून ५० हजार सभासदांचा एकजिनसी समूह आणि त्याची आर्थिक ताकद यामुळे स्वरूपानंद पतसंस्थेला सहकार क्षेत्रात मान्यता मिळत आहे, असे भावोद्गार संस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केले.


