(रत्नागिरी /प्रतिनिधी)
जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत दोन तस्करांना ताब्यात घेतले. या आरोपींकडून ‘ब्राउन हेरॉईन’सदृश्य अमली पदार्थाच्या एकूण १७५ पुड्या आणि इतर विक्रीसाठीचे साहित्य असा मिळून सुमारे ९० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या मोहिमेची रूपरेषा जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली आखण्यात आली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकाऱ्यांनी रत्नागिरी शहरात दिनांक २४ जुलै २०२५ रोजी गस्त घालण्याच्या वेळी ही कारवाई केली.
गोपनीय माहितीच्या आधारे, शहरातील राजीवडा ते कर्ला मार्गावरील बुडये मोहल्ला, राजीवडा येथे दोघेजण संशयास्पद हालचाली करताना आढळून आले. त्यांच्या हातातील पिशवीची पंचांसमक्ष तपासणी केली असता, त्यामध्ये ब्राउन हेरॉईनचे एकूण १७५ पुड्या आणि इतर विक्रीसाठी वापरण्यात येणारे साहित्य सापडले. याप्रकरणी मुस्तकीम युसुफ मुल्ला आणि मोहसीन नूरमोहम्मद फणसोपकर (दोघेही रा. राजीवडा, रत्नागिरी) यांच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक ३३१/२०२५ अन्वये अंमली पदार्थ नियंत्रण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांच्या ताब्यातून ११ ग्रॅम वजनाचे ब्राउन हेरॉईन आणि इतर मुद्देमाल असा मिळून ९०,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस ठाणे करीत आहे.
या यशस्वी कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह पो.उपनिरीक्षक संदीप ओगले, स.पो. फौजदार सुभाष भागणे, पो.हवा. शांताराम झोरे, नितीन डोमणे, बाळू पालकर, म.पो.हवा. वैष्णवी यादव, पो.हवा. भैरवनाथ सवाईराम, सत्यजीत दरेकर, योगेश नार्वेकर, विनायक राजवैद्य आणि चालक पो.कॉ. अतुल कांबळे आदी सहभागी होते.