(मुंबई)
अतिवृष्टी, पूर, अवेळी पाऊस, दुष्काळ, वादळी वारा व गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकरी व अन्य घटकांना शासनाने मदत जाहीर केली होती. यातील ५ लाख ३९ हजार ६०५ लाभार्थ्यांना ५९२ कोटी ३४ लाख ९० हजार ५३० रुपयांची मदत संबंधित लाभार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यावर मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.
सन २०२२, सन २०२३, सन २०२४, अवेळी पाऊस २०२२- २०२३, व २०२३-२०२४, अवेळी पाऊस, अतिवृष्टी २०२३-२०२४, दुष्काळ २०२३ आणि जून २०१९ मध्ये वादळी वारा व गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या लाभार्थींचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकरी व नागरिकांना शासनाकडून ही मदत त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर वर्ग झाल्यामुळे या घटकांना दिलासा मिळेल, असा विश्वासही मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी व्यक्त केला.
कोकण विभागामध्ये ८६५ लाभार्थ्यांना २१ लाख ८१ हजार ७८१ रुपयांची मदत आधारसंलग्न बँक खात्यावर वर्ग केली आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील १६ लाभार्थ्यांना १ लाख १० हजार ४८७ रुपये, रत्नागिरी जिल्ह्यातील ३ लाभार्थ्यांना ८ हजार ६०० रुपये, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७०३ लाभार्थ्यांना १२ लाख ८८ हजार ६३४ रुपये, ठाणे जिल्ह्यातील एका लाभार्थीस ९ हजार रुपये, पालघर जिल्ह्यातील १४२ लाभार्थीना ७ लाख ६५ हजार ६० रुपये बँक खात्यावर डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आले आहेत.