(पुणे)
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे आज (रविवार, १५ जून) एक भीषण दुर्घटना घडली आहे. इंद्रायणी नदीवरील जुना पूल अचानक कोसळल्याने २५ ते ३० पर्यटक थेट नदीत पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
ही घटना तळेगाव दाभाडे शहराच्या जवळ असलेल्या कुंडमळा या प्रसिद्ध पर्यटनस्थळी दुपारच्या सुमारास घडली. रविवार असल्याने परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होती. गर्दीतील काही पर्यटक पूलावर थांबले असताना पूल कोसळल्याने ते नदीत कोसळले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, ग्रामस्थ, आणि आपदा मित्र तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, बचाव व शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीचा प्रवाह अतिशय वेगवान असून, बचावकार्यात अडथळे येत आहेत.
घटनास्थळावर भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण आहे. प्रशासनाकडून अधिकृत माहिती अद्याप जाहीर झालेली नसली तरी घटनास्थळी सतत संपर्क ठेवून शोधमोहिम सुरू आहे.