( मुंबई )
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी २०२६ पासून, तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणार आहे.
राज्य मंडळाचे सहसचिव प्रमोद गोफणे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी-बारावीच्या लेखी, प्रात्यक्षिक आणि इतर परीक्षा घेतल्या जातात.
त्याअनुसार —
बारावीची लेखी परीक्षा : १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६
बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा : २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२६
(या कालावधीत माहिती तंत्रज्ञान, सामान्य ज्ञान इत्यादी विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांचाही समावेश असेल.)
दहावीची लेखी परीक्षा : २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६
दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा : २ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२६
(या अंतर्गत शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र, गृहशास्त्र या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांचा समावेश असेल.)
शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना अभ्यासक्रमाचे योग्य नियोजन करता यावे, तसेच विद्यार्थ्यांचा मानसिक ताण कमी व्हावा, या उद्देशाने मंडळाने वेळापत्रक अगोदरच जाहीर केले आहे.
परीक्षांचे सविस्तर विषयवार अंतिम वेळापत्रक लवकरच राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

