(रत्नागिरी / प्रतिनिधी)
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी रत्नागिरी येथील पूर्णकृती पुतळ्याजवळ मध्यरात्री तालुक्यातील हजारो नागरिक आदरांजली वाहण्यासाठी येत असताना फुल-हार, मेणबत्ती, अगरबत्ती व इतर नाशवंत वस्तूंना न आणता “वही-पेन शैक्षणिक साहित्य” सोबत आणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोखी असे अभिवादन करूया असे आवाहन सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
६ डिसेंबर म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन बाबासाहेब आंबेडकरांनी दिन-दलित समुदायाला माणुसकीच जीवन दिलंच, परंतु त्याच बरोबर शिक्षणाची कास धरून आपली प्रगती साधण्याचा मूलमंत्र देखील दिला. बाबासाहेबांचा हा मंत्र गेली ६० वर्षे आंबेडकरी समुदाय प्राणपणाने जपतो आहे. चैत्यभूमीवर आणि दीक्षाभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणारे सगळेच लोक प्रकर्षाने वैचारिक पुस्तकांची खरेदी करतांना आपल्याला दिसतात. शिक्षणाचं महत्व आज प्रत्येक आंबेडकरी माणूस जाणून आहे. त्याचंच पुढचं पाऊल म्हणजे. ‘एक वही,एक पेन’ हे अभियान!
महामानवास अभिवादन करण्यासाठी जिल्ह्याच्या कोनाकोपऱ्यांतून अनुयायी रत्नागिरीत येत राहतात. या महामानवाची ओळख ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ अशी आहे. अभिवादनासाठी जाताना मेणबत्ती, अगरबत्ती आणि पुष्प अर्पण करण्याची इच्छा अनेकांची असते. त्यामुळे अनेकांकडून डॉ बाबासाहेब आंबेडकरांना दरवर्षी मेणबत्त्या अगरबरत्यासह पुष्पहार, फुले अर्पण करून अभिवादन केले जाते. मात्र सर्व साहित्य पुढे कचरा रुपाने फेकले जाते. त्यामुळे या साहित्याऐवजी वही आणि पेन आणल्यास ते गरजू मुलांच्या उपयोगात येऊ शकते, या अभियानाची जनजागृती संस्थेच्या तरुणांकडून करण्यात येत आहे. आणि या उपक्रमाचे नागरिकांनीही स्वागत केले आहे. त्यामुळे या उपक्रमाला व्यापक रुप येण्याची शक्यता आहे. यावर्षीही उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास ही संस्थेचे चंद्रमणी सावंत यांनी व्यक्त केला आहे.