(संगमेश्वर /एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील विघ्रवली गावचे प्रतिष्ठित व सर्वपरिचित सामाजिक कार्यकर्ते शशिकांत महादेव इंदुलकर (वय ६८) यांचे शुक्रवारी त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
शशिकांत इंदुलकर हे तालुक्यात आजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. समाजातील लहान-मोठ्या प्रत्येकाशी ते अत्यंत आदराने व प्रेमाने वागत. सदैव हसतमुख, मितभाषी आणि मृदू स्वभाव हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष होते. सामाजिक, शैक्षणिक व ग्रामविकासाच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असायचा. गावातील अनेक प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता.
त्यांच्या अचानक जाण्याने मित्रमंडळी, आप्तेष्ट तसेच संपूर्ण गावाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या जाण्याने समाजाने एक संवेदनशील, कर्तव्यदक्ष व मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व गमावले असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार अत्यंत शोकाकुल वातावरणात करण्यात आले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, दोन नातवंडे असा परिवार आहे. विविध सामाजिक संस्था, ग्रामस्थ तसेच मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली आहे.

