(देवरुख)
कर्नाटकातील म्हैसूर येथे झालेल्या ३९व्या दक्षिण–पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवात मुंबई विद्यापीठाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावत अव्वल स्थान मिळवले. संगीत, नाट्य आणि नृत्य या तीन प्रमुख विभागांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत विद्यापीठाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले.
जे. एस. एस. अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च, म्हैसूर येथे पार पडलेल्या या महोत्सवात महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा येथील ३५ विद्यापीठांनी सहभाग घेतला होता. पाच विभागांतील २८ स्पर्धांमध्ये मुंबई विद्यापीठाच्या ६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत तब्बल २५ पारितोषिके मिळवली. एकूण ७६ गुणांसह विद्यापीठाने सर्वसाधारण विजेतेपदावर आपले नाव कोरले.
ललित कला म्हणजेच ‘फाईन आर्ट’ या विभागात मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना देवरुखच्या आठल्ये–सप्रे–पित्रे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि विश्वविख्यात रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे तसेच केशर चोपडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. गेल्या तीन वर्षांपासून विलास रहाटे हे मुंबई विद्यापीठ संघाचे मार्गदर्शन करत असून त्यांच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवले आहे.
या मार्गदर्शनाखाली मनोज चव्हाण यांनी रांगोळी व कोलाज या कला प्रकारांत, तर प्रथमेश म्हात्रे यांनी क्ले मॉडेलिंग (मातीकाम) या प्रकारात राष्ट्रीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवाच्या अंतिम स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. याशिवाय, प्रथमेश म्हात्रे यांनी पोस्टर मेकिंगमध्येही चमकदार कामगिरी करत मुंबई विद्यापीठाचा नावलौकिक वाढवला. आगामी “३९वा आंतरविद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सव २०२५–२६” हा १० ते १४ मार्च दरम्यान सत्यभामा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, चेन्नई येथे आयोजित करण्यात आला आहे.
या यशात माजी विद्यार्थी आणि राष्ट्रीय स्तरावरील विजेते मार्गदर्शकांचे योगदान मोलाचे ठरले. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील आणि सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे यांनी स्पर्धेचे नियोजन यशस्वी केल्याबद्दल विशेष कौतुक करण्यात आले. तसेच कुलगुरू प्रा. (डॉ.) रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांनी विजयी संघातील सर्व विद्यार्थी व मार्गदर्शकांचे अभिनंदन करून राष्ट्रीय महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या.

