(संगमेश्वर / प्रतिनिधी)
ताम्हाणे–नांदळज मुख्य रस्त्यालगत असलेल्या शिवणे फाटा ते प्राथमिक शाळा शिवणे नं. ०२ या सुमारे अडीच किमी लांब रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत खराब झाली असून, या रस्त्याकडे प्रशासनाचे गेली अनेक वर्षे दुर्लक्ष झाले आहे. या रस्त्याचे शेवटचे डांबरीकरण तब्बल २८ वर्षांपूर्वी झाले होते.
दररोज चिरा-खाणीचे अवजड ट्रक या रस्त्यावरून जात असल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्याचा उपयोग शिवणे-गवळीवाडी, होरंबेवाडी, सनगरेवाडी आणि गुरववाडी येथील नागरिक दररोज करतात. मात्र सध्या रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली आहे की, वाहनचालकांसोबत पायी चालणाऱ्यांनाही यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रशासनाकडे या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली. २०१८ साली विद्यमान आमदारांनी रस्त्याचे डांबरीकरण करून देण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र त्यानंतर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. या रस्त्याचे डांबरीकरण तातडीने व्हावे आणि नागरिकांची होणारी गैरसोय थांबावी, अशी मागणी आता पुन्हा एकदा ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांच्याकडे केली आहे.