(दापोली)
दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या नव्या इमारतीच्या बांधकामस्थळी सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना न केल्यामुळे एका ९ वर्षीय बालकाचा पाण्याने भरलेल्या टाकीत बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना घडली आहे. १२ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १२.३० ते ३.३० या वेळेत ही दुर्घटना घडली असून, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत मुलाचे नाव समीर श्रीकांत चव्हाण (वय ९, रा. मंदरूप, ता. सोलापूर) असे असून, तो खेळता खेळता बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या आवारात शिरला. तिथे असलेल्या उघड्या आणि पावसाचे पाणी भरलेल्या टाकीमध्ये पडून त्याचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी समीरचे वडील श्रीकांत काशिनाथ चव्हाण (वय ३२, व्यवसाय जेसीबी चालक) यांनी दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, ठेकेदार संदीप माधवराव पाटील (रा. विटा, जि. सांगली), ताहिर हुसेन कोकणे (रा. मिरज), आणि एक इसम ‘जग्गू’ (पूर्ण नाव व गाव अज्ञात) यांच्यावर गुन्हा क्रमांक ११२/२०२५, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १०५, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, इमारतीच्या आजूबाजूला कंपाउंड किंवा इतर कोणतीही सुरक्षा यंत्रणा लावण्यात आलेली नव्हती. तसेच, पाण्याच्या टाकीवर झाकण अथवा कोणतीही अडथळा यंत्रणा नव्हती. परिसरात पाणी साचलेले असतानाही कोणताही चेतावणी फलक, कर्मचारी किंवा मार्गदर्शन करणारी व्यक्ती उपस्थित नव्हती. ही घटना केवळ दुर्घटना नसून, ठेकेदारांच्या निष्काळजीपणा व हलगर्जीपणामुळे घडलेली चूक आहे, अशी संतप्त भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. या घटनेबाबत १२ जून २०२५ रोजी रात्री ९.३१ वाजता गुन्हा अधिकृतपणे नोंद करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.