(दापोली/ रत्नागिरी)
दापोली येथील आरोग्य केंद्रातून पुढील उपचारांसाठी रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या अंदाजे ५५ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सलीम फकीर (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते दापोली येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सलीम फकीर यांना प्रकृतीच्या कारणास्तव दापोली आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेद्वारे पुढील उपचारांसाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयातील पुरुष विभागात उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच ९ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.१५ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्रकृती खालावली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक ८९/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ प्रमाणे १८ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४.२४ वाजता करण्यात आली आहे. मृत व्यक्तीचे पूर्ण नाव आणि पत्ता अद्याप उपलब्ध नसल्याने त्यांच्या ओळखीबाबत अधिक माहिती मिळविण्याची आवश्यकता आहे.


