(लांजा)
तालुक्यातील गवाणे-रामाणेवाडी परिसरात बुधवारी (११ जून) सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास जोरजोराने बिबट्याच्या डरकाळ्यांचा आवाज ऐकू आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अचानक आलेल्या या आवाजाने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बिबट्याच्या हालचालींमुळे वन विभागाची चिंता अधिकच वाढली आहे.
या घटनेला ८ जून रोजी पुनस गावाजवळ सापडलेल्या बिबट्याच्या पिल्लाशी जोडले जात आहे. अंदाजे १५-२० दिवसांचे हे पिल्लू रस्त्यालगत आढळून आले होते. पिल्लू वन विभागाच्या ताब्यात असून त्याच्या आईची शोधमोहीम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. वन विभागाने या मादी बिबट्याला पिल्लू सापडलेल्या ठिकाणी परत येते का, हे पाहण्यासाठी सलग दोन रात्री तेथे पिल्लाला ठेवले होते. मात्र, अपेक्षेप्रमाणे बिबट्या मादी त्या ठिकाणी परत न आल्याने विभागाच्या प्रयत्नांना अपयश आले.
दरम्यान, बुधवारी रामाणेवाडी परिसरात ऐकू आलेले डरकाळ्यांचे आवाज आणि पिल्लाच्या शोधात फिरणाऱ्या मादी बिबट्याच्या हालचालींमध्ये साम्य असल्याची शक्यता ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. “ती मादी पिल्लाच्या शोधात पुनसपासून या भागात फिरत असावी,” असा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला. बिबट्याच्या ओरडण्याचा आवाज दीर्घकाळ ऐकू येत होता. अखेर ग्रामस्थांनी फटाके वाजवल्यानंतर बिबट्या तेथून निघून गेला. मात्र बिबट्याच्या हालचालीमुळे परिसरात दहशतीचं वातावरण पसरले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.