(दापोली / सुदेश तांबे)
मासेमारी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे बोट मालक पांडुरंग नामदेव चौगुले (वय 40 वर्षे, व्यवसाय मासेमारी, राहणार पाजपंढरी, बावापीर आळी, दापोली) यांनी मासेमारी बोटीचा खलाशी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.
पांडुरंग नामदेव चौगुले यांनी आपल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, माझी स्वतःची मासेमारी बोट असून मी हर्णे बंदरामध्ये मासेमारी करीत असतो. बोटीवर एकुण 5 कामगार खलाशी म्हणून काम करतात. दिनांक 04/02/2025 रोजी समुद्रामध्ये वारा जास्त प्रमाणात असल्यामुळे हर्णे बंदरावरील बहुतांशी बोटी या नांगर टाकुन किना-यावर उभ्या होत्या, त्यामध्ये माझी “श्रीरामगीरी” ही बोट देखील उभी होती. बोट मासेमारी करीता मासेमारीसाठी जाणार नसल्यामुळे सदर बोटीवरील दोन खलाशी यांना घेवुन मी दिनांक 05/02/2025 रोजी माझ्या घरी गेलो. तसेच बोटीवरील दोन खलाशी हे तीन ते चार दिवसापासुन सुट्टीवर होते.
दरम्यान, बोटीवर काम करणारा नामे भावेश मनोहर घावटे (वय- 31 वर्षे रा. पाबरे ता. मरला जि. रायगड) हा बोटीवरच थांबुन होता. मी दुपारी 12.00 वा. सुमारास हर्णे बंदर येथे किना-यावर बोट लावणेत आली होती, त्या ठिकाणी बोटीमध्ये गेलो असता मला खलाशी नामे भावेश मनोहर घावटे हा कोठेही मिळून आला नाही. तेव्हा मी त्याला त्याचे मोबाईलवर फोन केला असता तो बंद लागत होता. तेव्हा मी बंदराचे आजुबाजुचे परीसरात व जवळपासचे लोकांकडे चौकशी केली असता तो कोठेही मिळून आला नाही. त्यांनंतर मी माझ्या बोटीशेजारी लावणेत आलेली लहान होडीही (पगार) कोठे दिसली नाही. म्हणुन मी त्याचाही शोध घेतला असता ती मला हर्णे जेटी या ठिकाणी मिळून आली. तेव्हा मला संशय आला की, माझे बोटीवरील खलाशी नामे भावेश मनोहर घावटे हा त्या होडीतून (पगार) गेला असावा. म्हणुन मी त्याचे नोतेवाईक यांना फोन करुन विचारले की, भावेश घरी आला आहे का, तेव्हा त्याचे नातेवाईकांनी तो इकडे आला नसल्याचे सांगितले. म्हणुन आम्ही खात्री करणेकरीता त्याचे मुळ गावी पाबरे जि. रायगड या ठिकाणी त्याचा शोध घेणेकरीता गेलो, तेथे पण तो तेथेही आम्हाला मिळुन आला नाही. आम्ही परत हर्णे मध्ये आलो व त्यानंतर आम्ही दिनांक 06/02/2025 रोजी सकाळी परत हर्णे बंदर परीसरात शोधाशोध केली तसेच आजुबाजुचे परीसरात शोध घेतला असता खलाशी नामे भावेश मनोहर घावटे हा कोठेही मिळुन आला नाही.
सदर नापत्ता खलाशी व्यक्तिचे वर्णन पुढील प्रमाणे आहे. भावेश मनोहर घावटे (वय 31 वर्षे) शिक्षण 10 वी, जात- कोळी, रंग गोरा, उंची 5 फुट 7 इंच, केस- काळे, डोळे काळे, अंगावर नेसणीस- पांढ-या रंगाचा हाप टी-शर्ट, व नीळ्या रंगाची जीन्स पँन्ट घातली असून वरील व्यक्ती कोणाला आढळून आणल्यास त्यांनी दापोली पोलीस स्थानकाशी असे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.