(रत्नागिरी)
वन आच्छादनाचे संरक्षण, पक्ष्यांचा अधिवास जतन आणि निसर्गसाखळी मजबूत ठेवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनिल लिमये यांनी केले. वनांमुळेच पक्ष्यांचा अधिवास सुरक्षित राहतो आणि पक्षी हे नैसर्गिक बीजप्रसारक असल्याने जंगलांचे पुनर्संचयन निसर्ग स्वतः करतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
वन विभागामार्फत रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच जिल्हास्तरीय पक्षी मित्र संमेलन येथील हॉटेल कोहिनूर येथे उत्साहात पार पडले. यावेळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रसंचालक जितेंद्र रामगावकर, मुख्य वनसंरक्षक (प्रा.) कोल्हापूर जी. गुरुप्रसाद, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक तुषार चव्हाण, उपवनसंरक्षक किरण जगताप, सामाजिक वनीकरण विभागाचे रणजीत गायकवाड, विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांची उपस्थिती होती.
पक्षी संरक्षण ही सामूहिक जबाबदारी
मार्गदर्शन करताना सुनिल लिमये म्हणाले की, झाडे लावणे, पक्षी वाचवणे किंवा त्यांच्या जातींचे संरक्षण करणे हे केवळ वन विभागाचे काम नाही. यासाठी विविध संस्था, संघटना, संशोधक आणि नागरिकांनी एकत्र येणे आवश्यक आहे. रत्नागिरी जिल्ह्यात चांगली वनसंपदा, माळराने, देवराई आणि पाणथळ क्षेत्रे असून काही ठिकाणे कागदोपत्री वन म्हणून घोषित नाहीत. अशा जागा शोधून त्या वन क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी सामूहिक प्रयत्न व्हावेत, असे त्यांनी सुचवले. आज सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम असून, पक्षी व अधिवास संवर्धनासाठी जनजागृती आणि दबाव गट निर्माण करणे काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कोकणातील पक्षी वैविध्याचे महत्त्व
मुख्य वनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांनी पक्षी आणि प्राणी संरक्षणासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
तुषार चव्हाण यांनी रत्नागिरीत पक्षी संमेलनाची सुरुवात ही कौतुकास्पद बाब असून, भविष्यात या उपक्रमाचे महत्त्व अधिक वाढेल, असे मत व्यक्त केले. भारतात सुमारे १३००, महाराष्ट्रात जवळपास ५०० तर कोकणात मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित पक्षी आढळतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
जितेंद्र रामगावकर यांनी जिल्ह्यातील विविध पक्षी प्रजातींच्या संवर्धनासाठी या संमेलनातून उपयुक्त ज्ञान मिळेल, असे सांगितले.
महाधनेश जिल्ह्याची ‘फ्लॅगशिप प्रजाती’
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या सहकार्याने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने ग्रेट इंडियन हॉर्नबिल अर्थात महाधनेश या पक्ष्याला रत्नागिरी जिल्ह्याच्या वन व पक्षी पर्यटनाची प्रमुख (फ्लॅगशिप) प्रजाती म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात आले. या पक्ष्याच्या चार प्रजाती जिल्ह्यात आढळतात, ही बाब कोकणातील जैवविविधतेचे वैशिष्ट्य अधोरेखित करते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व वृक्षाला पाणी देऊन करण्यात आली. राज्यभरातील पक्षी निरीक्षक, संशोधक, अभ्यासक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि वन विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संमेलनामुळे रत्नागिरी जिल्ह्याचे नाव निसर्ग व पक्षी पर्यटनाच्या नकाशावर अधिक ठळकपणे उमटेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

