(रत्नागिरी)
तालुक्यातील काळबादेवीजवळ बसणी परिसरात दोन एसटी बस एकमेकांना समोरासमोर धडकल्याची घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. या अपघातामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून लांबच लांब रांगा लागल्या आहे.
प्राप्त माहितीनुसार, एक एसटी बस रत्नागिरीहून गणपतीपुळे मार्गावर जात होती, तर दुसरी बस गणपतीपुळेहून रत्नागिरीकडे येत होती. दोन्ही बस एकमेकांना अगदी समोरासमोर धडकल्या. धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की दोन्ही वाहनांच्या डाव्या बाजूला मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून, दोन्ही बसमधील प्रवासी सुखरूप आहेत. मात्र अपघातानंतर रस्त्यावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या असून, फक्त रिक्षा आणि दुचाकी वाहनेच मार्ग काढताना दिसत आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पुढील चौकशी सुरू आहे. मात्र नागरिकांनी प्रशासनाकडे अपघातग्रस्त रस्त्यांवर वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याची मागणी केली आहे.