(रत्नागिरी / वार्ताहर)
भोके (ता. रत्नागिरी) येथे मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतर्गत भोके फाटा ते भोके रेल्वे स्टेशन या जोड रस्त्याचे अपूर्ण काम आणि रखडलेले डांबरीकरण तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेनेतर्फे करण्यात आली आहे.
याबाबत प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांना जाहीर निवेदन देण्यात आले. हे निवेदन युवासेना युवती तालुका अधिकारी सौ. युक्ता योगेश आंबेकर यांच्या वतीने सादर करण्यात आले. यावेळी रत्नागिरी शिवसेना तालुकाप्रमुख श्री. मयुरेश्वर पाटील यांनी रखडलेल्या कामाबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारत तीव्र नाराजी व्यक्त केली. योगेश आंबेकर हेही उपस्थित होते.
या रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत सोडण्यात आले असून, मोऱ्या टाकल्यानंतरही डांबरीकरण पूर्ण झालेले नाही. त्यामुळे रस्त्यावर मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचून वाहनचालकांना खोलीचा अंदाज येत नाही, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
तात्पुरती टाकलेली खडीही वाहून गेल्याने रस्ता अधिकच खराब झाला असून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या प्रवाशांसह ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनल्याने रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून दर्जेदार डांबरीकरण करावे, अशी ठाम मागणी करण्यात आली.
दरम्यान, उपस्थित कार्यकारी अभियंत्यांनी पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेऊन तात्काळ खड्डे बुजविण्याचे आणि मोऱ्यांचे अपूर्ण काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. पावसाचा अडथळा कमी होताच संपूर्ण रस्त्याचे गुणवत्तापूर्ण डांबरीकरण करून सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण केली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
यावेळी युवासेनेने स्पष्ट केले की, स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पक्ष कटिबद्ध असून दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी तातडीने न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.

