(रत्नागिरी / वार्ताहर)
पुण्यातील बालेवाडी येथे १७ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित १८ व्या राज्यस्तरीय पॅरा जलतरण स्पर्धेत रत्नागिरीच्या मल्हार श्रीकृष्ण सुतवणे याने उल्लेखनीय कामगिरी केली. ‘पॅरा ऑलिम्पिक असोसिएशन’तर्फे आयोजित या स्पर्धेत मल्हारने २ सुवर्ण आणि १ रौप्य पदक पटकावले. या यशाच्या जोरावर त्याची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेला मल्हार हा रत्नागिरीतील पहिला व एकमेव दिव्यांग खेळाडू ठरला आहे.
मल्हार हा ‘महेश मिलके स्विमिंग ग्रुप’चा खेळाडू आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेत त्याने प्रथमच सहभाग घेतला होता. मात्र, पहिल्याच प्रयत्नात त्याने गेली ५ ते ६ वर्षे सातत्याने पदके मिळवणाऱ्या बलाढ्य आणि अनुभवी खेळाडूंना मागे टाकत सुवर्णपदक पटकावले. त्याच्या या कामगिरीमुळे स्पर्धेत त्याने स्वतःची वेगळी छाप पाडली.
मल्हारच्या या यशामागे त्याचा कठोर सराव आणि प्रशिक्षक महेश मिलके यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. राज्यस्तरीय स्पर्धेत मिळवलेल्या या यशामुळे मल्हारची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्याच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
मल्हारच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महेश मिलके स्विमिंग ग्रुपसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत.


