(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रत्नागिरी पोलीस दलाने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) प्रभावी वापरातून हरवलेल्या मुलीचा यशस्वी आणि सुखरूप शोध घेतला आहे. AI आधारित ‘RAIDS’ (Ratnagiri Advanced Integrated Data System) या अत्याधुनिक अॅपच्या मदतीने ही शोधमोहीम राबविण्यात आली असून, तंत्रज्ञानाधारित पोलीसिंगचा हा एक उल्लेखनीय नमुना ठरला आहे.
दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी संबंधित मुलगी हरवल्याची तक्रार रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुलीचे छायाचित्र RAIDS अॅपमधील ‘Missing Persons’ विभागात अपलोड केले.
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या दूरदृष्टीतून विकसित करण्यात आलेल्या या अॅपमधील Dev-Drushti AI प्रणालीच्या सहाय्याने मुलीच्या तब्बल १०८ वेगवेगळ्या AI जनरेटेड प्रतिमा तयार करण्यात आल्या. त्यामुळे संभाव्य ठिकाणी ओळख पटविणे अधिक सोपे व अचूक झाले. या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हरवलेली मुलगी इगतपुरी रेल्वे स्थानक परिसरात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. विवेक पाटील व त्यांच्या तपास पथकाने तातडीने कारवाई केली. अथक प्रयत्नांनंतर मुलीचा सुखरूप शोध घेण्यात पोलिसांना यश आले.
या मुलीला सुरक्षितपणे रत्नागिरी येथे आणून तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. मुलगी सुखरूप परतल्याने कुटुंबीयांनी रत्नागिरी पोलिसांचे आभार मानले. AI आधारित RAIDS अॅपच्या प्रभावी वापरामुळे हरवलेल्या व्यक्तींचा शोध अधिक जलद, अचूक आणि परिणामकारक ठरत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. रत्नागिरी पोलीस दलाच्या तंत्रज्ञानस्नेही व नागरिक-केंद्रित पोलीसिंगचा हा आणखी एक यशस्वी आणि प्रेरणादायी दाखला मानला जात आहे.

