(लांजा)
लांजा तालुक्यातील कोर्ले मुस्लिमवाडी येथे कौटुंबिक वादातून एक गंभीर प्रकार घडला असून, दिर आणि सासऱ्याने मिळून सुनेला कोयत्याने मारहाण करून जखमी केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार ६ जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडला. या प्रकरणी १० जून रोजी रात्री उशिरा लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेची ओळख आयशा दिलदार थोडगे (वय ३०, रा. कोर्ले, मुस्लिमवाडी) अशी असून, त्यांनीच या प्रकरणी तक्रार दिली आहे. आयशा यांचे दीर मुबारक इब्राहिम थोडगे (वय ४५) आणि सासरे इब्राहिम युनूस थोडगे (वय ७०) हे एकाच घरात विभक्त राहत असून, त्यांच्यात पूर्वीपासून कौटुंबिक वाद सुरु आहे.
६ जून रोजी आयशा यांचे पती दिलदार थोडगे हे चिपळूणहून घरी आल्यानंतर त्यांनी आपली कार घरासमोर लावली. यावरून मुबारक आणि इब्राहिम थोडगे यांनी संताप व्यक्त करत दिलदार यांना “तू इथे गाडी लावू नकोस, इथे तुझं काहीही नाही” असे म्हणत हुज्जत घातली. वाद विकोपाला गेल्यानंतर त्यांनी गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला तसेच शिवीगाळ करत वातावरण तापवले.
दरम्यान, आवाज ऐकून घराबाहेर आलेल्या आयशा यांनाही शिवीगाळ करत मुबारकने नारळाच्या झापाने त्यांच्यावर हल्ला केला. इतकेच नव्हे तर “तूच या भांडणाचा मूळ कारण आहेस, तुला संपवतो” अशी धमकी देत घरातून कोयता घेऊन थेट आयशा यांच्यावर धावून गेला. त्यांनी हात पुढे करून बचाव करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या एका हाताच्या मधल्या बोटाला आणि दुसऱ्या हाताच्या करंगळीशेजारच्या बोटाला खोल जखमा झाल्या.
या धक्कादायक घटनेनंतर आयशा थोडगे यांनी लांजा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुबारक थोडगे व इब्राहिम थोडगे यांच्याविरुद्ध गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. लांजा पोलीस पुढील तपास करीत आहेत.