( सांगली )
सांगली जिल्ह्यातील कुपवाड शहरातील एकता नगरमध्ये वटपौर्णिमेच्या रात्री घडलेली घटना संपूर्ण परिसराला हादरवून टाकणारी ठरली आहे. एका नवविवाहितेने आपल्या पतीचा झोपेत असताना कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, दोघांचे लग्न अवघ्या १७ दिवसांपूर्वीच पार पडले होते.
मृत पतीचे नाव अनिल तानाजी लोखंडे (वय ५०) असे असून, हत्या करणाऱ्या पत्नीचे नाव राधिका लोखंडे इंगळे आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लग्नानंतर काही दिवसांतच पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाले होते. या वादातूनच राधिकाने खुनाचा टोकाचा निर्णय घेतल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, वटपौर्णिमेच्या रात्री अनिल झोपेत असताना, राधिकाने त्यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करत हत्या केली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि संशयित पत्नीला ताब्यात घेतले. सध्या पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू आहे. या हत्येमागे आणखी कोणते कारण आहे का, याचा शोध घेतला जात आहे. याआधी इंदूरमध्ये घडलेल्या राजा रघुवंशी हत्येच्या घटनेने देशभरात खळबळ उडवली होती.