( मुंबई )
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी, गायिका आणि बँकिंग क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी अमृता फडणवीस यांनी आपल्या व्यावसायिक आयुष्यातील महत्त्वाचा अध्याय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल 23 वर्षांची प्रदीर्घ सेवा दिल्यानंतर त्यांनी Axis Bank मधील कॉर्पोरेट कारकीर्द संपवली असून, सोशल मीडियावरील भावनिक पोस्टद्वारे त्यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे. दोन दशकांहून अधिक काळ बँकिंग क्षेत्रात सक्रिय राहिल्यानंतर आता अमृता फडणवीस पूर्णवेळ कला आणि सामाजिक कार्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याची चर्चा आहे.
अमृता फडणवीस यांनी 23 वर्षांपूर्वी अॅक्सिस बँकेत ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. सातत्यपूर्ण मेहनत, व्यावसायिक कौशल्य आणि नेतृत्वगुणांच्या बळावर त्यांनी ब्रँच ऑपरेशन्स, कॉर्पोरेट बँकिंग, ट्रेझरी आणि कस्टमर रिलेशन्ससारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये काम केले. प्रशिक्षणार्थी म्हणून सुरू झालेला हा प्रवास टप्प्याटप्प्याने पुढे जात अखेरीस सीनियर व्हाइस प्रेसिडेंट पदापर्यंत पोहोचला. बँकेच्या विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी संस्थेच्या वाढीत मोलाचे योगदान दिले, अशी भावना बँकिंग क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.
आपल्या निरोपाच्या पोस्टमध्ये अमृता फडणवीस म्हणाल्या की, “23 वर्षांपूर्वी एक तरुण मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून या संस्थेत पाऊल ठेवले. आज सीनियर व्हाइस प्रेसिडेंट म्हणून कृतज्ञतेने निरोप घेत आहे. ही संस्था माझ्यासाठी कुटुंब, गुरु आणि दुसरे घर ठरली.” त्यांनी सहकारी आणि वरिष्ठांचे आभार मानत बँकेचे एमडी आणि सीईओ अमिताभ चौधरी यांच्या मार्गदर्शनाचा विशेष उल्लेख केला. या प्रवासातून आयुष्यभर उपयोगी पडतील असे धडे आणि जपून ठेवाव्यात अशा मैत्री मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.
9 एप्रिल 1979 रोजी नागपूर येथे जन्मलेल्या अमृता फडणवीस यांनी जी.एस. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स येथून वाणिज्य शाखेची पदवी घेतली. त्यानंतर पुण्यातील सिम्बायोसिस संस्थेतून फायनान्समध्ये एमबीए पूर्ण करून 2003 मध्ये त्यांनी अॅक्सिस बँकेत व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. 2005 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचा विवाह झाला. राजकीय कुटुंबाशी संबंधित असूनही त्यांनी आपली नोकरी आणि स्वतंत्र व्यावसायिक ओळख कायम ठेवत बँकिंग क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला.
बँकिंग क्षेत्रासोबतच अमृता फडणवीस कला क्षेत्रातही सक्रिय राहिल्या आहेत. 2017 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘नॅशनल प्रेअर ब्रेकफास्ट’ कार्यक्रमात भारताचे प्रतिनिधित्व केल्याने त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरही दखल घेण्यात आली होती. गायिका म्हणून त्यांची ओळख विशेषत्वाने 2014 नंतर अधिक ठळक झाली. दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या ‘जय गंगाजल’ चित्रपटातील “सब धन माटी” या गाण्याद्वारे त्यांनी पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण केले. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनावर आधारित ‘संघर्ष यात्रा’ या प्रकल्पासाठीही त्यांनी गीत गायले.
अमिताभ बच्चन यांच्यासोबत आणि T-Series द्वारे प्रदर्शित झालेल्या ‘फिर से’ या म्युझिक व्हिडिओला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. पहिल्याच दिवशी सात लाखांहून अधिक आणि तीन दिवसांत 14 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्याने त्या चर्चेत आल्या. पुढे 2018 मध्ये मुंबईतील पोईसर, दहिसर, ओशिवरा आणि मिठी नद्या वाचवण्यासाठी त्यांनी “मुंबई रिव्हर अँथम” सादर केले. 2020 मध्ये ॲसिड हल्ल्यातील पीडितांसाठी “अलग मेरा ये रंग है”, कोरोना योद्ध्यांसाठी “तू मंदिर तू शिवाला” आणि महिला सक्षमीकरणासाठी “तिला जगू दिया” ही गाणी गाऊन त्यांनी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला.
बँकिंग क्षेत्रातील प्रदीर्घ कारकीर्दीला पूर्णविराम दिल्यानंतर आता अमृता फडणवीस संगीत, कला आणि सामाजिक उपक्रमांवर अधिक लक्ष केंद्रित करतील, अशी चर्चा आहे. “या संस्थेतून आयुष्यभरासाठीचे धडे आणि अनेक मित्र घेऊन जात आहे,” असे म्हणत त्यांनी आपल्या नव्या प्रवासाची नांदी केली असून, त्यांच्या या निर्णयाकडे राजकीय, सांस्कृतिक आणि व्यावसायिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

