(कोल्हापूर / वृत्तसंस्था)
करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दक्षिणायन किरणोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी सूर्यकिरणांनी देवीच्या चरणांपासून कमरेपर्यंत प्रवास करत अखेर खांद्याला स्पर्श केला आणि त्यानंतर ते लुप्त झाले. सायंकाळी ५ वाजता महाद्वार रोडवरून सुरू झालेला सूर्यकिरणांचा प्रवास मंदिरातील विविध टप्पे पार करत ५ वाजून ४८ मिनिटांनी देवीच्या खांद्यापर्यंत पोहोचला. हा वैशिष्ट्यपूर्ण किरणोत्सव पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या भाविकांनी समाधान व्यक्त केले.
किरणोत्सवाच्या प्रवासादरम्यान सूर्यप्रकाशाची तीव्रता विविध ठिकाणी मोजण्यात आली. सायंकाळी ५ वाजता महाद्वार रोडवर २२ हजार लक्स इतकी तीव्रता नोंदविण्यात आली. त्यानंतर ५ वाजून ४ मिनिटांनी गरुड मंडपामागे १३,५०० लक्स, ५ वाजून ६ मिनिटांनी सदरेवर १२,३०० लक्स, तर ५ वाजून ११ मिनिटांनी गरुड मंडपाच्या मध्यभागी ८,९७० लक्स तीव्रतेची नोंद झाली.
यानंतर सूर्यकिरणांनी कासव चौकातून गर्भगृहाच्या दिशेने वाटचाल केली. सायंकाळी ५ वाजून २९ मिनिटांनी कासव चौकात प्रकाशाची तीव्रता १,०७० लक्स इतकी होती. पुढे ५ वाजून ३६ मिनिटांनी पितळी उंबरठ्यावर ४१० लक्स, तर ५ वाजून ३९ मिनिटांनी पहिल्या पायरीवर ८८.१० लक्स तीव्रता नोंदविण्यात आली.
या प्रवासातील महत्त्वाचा क्षण सायंकाळी ५ वाजून ४४ मिनिटांनी अनुभवायला मिळाला. यावेळी सूर्यकिरणांनी श्री अंबाबाईच्या चरणांना स्पर्श केला. त्यानंतर अवघ्या दोन मिनिटांत म्हणजे ५ वाजून ४६ मिनिटांनी किरणे देवीच्या कमरेपर्यंत पोहोचली. अखेर ५ वाजून ४८ मिनिटांनी सूर्यकिरणांनी देवीच्या खांद्याला स्पर्श केला आणि त्यानंतर ते लुप्त झाले.
अशा प्रकारे महाद्वार रोडपासून गर्भगृहापर्यंतचा प्रवास पूर्ण करत सूर्यकिरणांनी तिसऱ्या दिवशी देवीच्या खांद्यापर्यंत पोहोचण्याचा टप्पा गाठला. या किरणोत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित असलेल्या भाविकांना सूर्यकिरणांनी देवीला केलेल्या स्पर्शाचे दर्शन घडले.


