(मुंबई / वृत्तसंस्था)
देशातील सर्वाधिक स्वच्छ शहरांच्या राष्ट्रीय स्पर्धेत नवी मुंबईने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 मध्ये नवी मुंबईने देशातील प्रथम क्रमांकाचा स्वच्छ शहर पुरस्कार पटकावत महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या स्वच्छता पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने एकूण 5 पुरस्कार मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कौतुकाची बाब म्हणजे नवी मुंबई शहराने सलग १० वर्ष स्वच्छतेच्या स्पर्धेत विविध गटातून पुरस्कार मिळवत यंदा स्वच्छ शहराचा मान मिळवला आहे. नवी मुंबईसोबतच सांगली जिल्ह्यातील विटा, कोल्हापूर जिल्ह्यातील पाचगणी आणि रत्नागिरी शहराचाही राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला आहे. तर राज्यातील पहिले स्वच्छ शहर पुरस्कार म्हणून पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेने बहूमान मिळवला आहे.
केंद्र सरकारच्या केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या शहरी विकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली देशभरात स्वच्छ सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. बुधवारी, 11 नोव्हेंबर रोजी राजधानी नवी दिल्ली येथे स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2025-26 अंतर्गत विजेत्या शहरांची घोषणा करून त्यांचा सन्मान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील स्वच्छ शहरांना गौरविण्यात आले. यंदा या पुरस्कारांचे दहावे वर्ष होते.
नवी मुंबईने देशातील सर्वाधिक स्वच्छ शहराचा प्रथम क्रमांक मिळविला. हा पुरस्कार नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी स्वीकारला. यावेळी उपमहापौर दशरथ भगत, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे आणि शहर अभियंता शिरीष आरदवाड उपस्थित होते. विशेष म्हणजे, नवी मुंबई महानगरपालिकेने सलग 10 वर्षे स्वच्छतेच्या राष्ट्रीय स्पर्धेत विविध गटांमध्ये पुरस्कार मिळवण्याची कामगिरी केली आहे.
या सोहळ्याला केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहारमंत्री मनोहरलाल खट्टर, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री तोखन साहू यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यंदाच्या पुरस्कारांमध्ये केवळ स्वच्छ शहरांनाच नव्हे, तर स्वच्छ शहर जोडी उपक्रमांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शहरांनाही सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्रासाठी आणखी एक अभिमानाची बाब म्हणजे सांगली जिल्ह्यातील विटा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पाचगणी या शहरांनी स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळवला आहे. त्याचबरोबर स्वच्छ किनारपट्टीचे शहर म्हणून रत्नागिरीचा गौरव करण्यात आला. राज्यातील पहिले स्वच्छ शहर पुरस्कार म्हणून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेनेही बहुमान मिळवला आहे.
स्वच्छ शहर जोडी या उपक्रमात गुजरातमधील अहमदाबाद आणि सानद, मध्य प्रदेशातील इंदोर आणि डेपलापूर, तसेच आंध्र प्रदेशातील तिरुपती आणि कुप्पम या शहरांना पुरस्कार मिळाले आहेत.
स्वच्छ शहर लीगमध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबईने प्रथम क्रमांक पटकावला. गुजरातमधील सुरत दुसऱ्या, तर आंध्र प्रदेशातील विजयवाडा तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमने प्रथम क्रमांक मिळवला. मध्य प्रदेशातील जबलपूर दुसऱ्या, तर उत्तर प्रदेशातील लखनौ तिसऱ्या क्रमांकावर राहिले. 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या गटात मध्य प्रदेशातील उज्जैनने अव्वल स्थान मिळवले. चंदीगड दुसऱ्या, तर आंध्र प्रदेशातील गुंठूर तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
50 हजार ते 3 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात मध्य प्रदेशातील देवासने पहिला क्रमांक मिळवला. नवी दिल्ली महानगरपालिकेला दुसरा, तर मध्य प्रदेशातील सागरला तिसरा क्रमांक मिळाला. 20 ते 50 लाख लोकसंख्येच्या गटात महाराष्ट्रातील विटा (सांगली) प्रथम क्रमांकावर राहिले. ओडिशातील आस्का दुसऱ्या, तर गोव्यातील पणजी तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
20 हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात छत्तीसगडमधील बिल्हा प्रथम क्रमांकावर राहिले. महाराष्ट्रातील पाचगणीने दुसरा, तर मध्य प्रदेशातील बुधनीने तिसरा क्रमांक मिळवला.
स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 मधील या निकालांमुळे राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छता स्पर्धेत महाराष्ट्राची कामगिरी पुन्हा अधोरेखित झाली आहे. नवी मुंबईचा देशात पहिला क्रमांक, विटा आणि पाचगणीचे यश तसेच रत्नागिरीचा स्वच्छ किनारपट्टी शहर म्हणून झालेला गौरव यामुळे राज्याला यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात विशेष स्थान मिळाले आहे.
स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२५-२६ चे मानकरी
स्वच्छ शहर जोडी
१) गुजरात : अहमदाबाद व सानद
२) मध्य प्रदेश : इंदोर व डेपलापूर
३) आंध्र प्रदेश : तिरुपती व कुप्पम
स्वच्छ शहर लीग
१) महाराष्ट्र : नवी मुंबई
२) गुजरात :सुरत
३) आंध्रप्रदेश : विजयवाडा
स्वच्छ शहर (१० लाख पेक्षा अधिक लोकसंख्या)
१) आंध्र प्रदेश : विशाखापट्टणम
२) मध्यप्रदेश : जबलपूर
३) उत्तर प्रदेश : लखनौ
स्वच्छ शहर (३ ते १० लाख लोकसंख्या)
१) मध्यप्रदेश : उज्जैन
२) चंदीगड
३) आंध्रप्रदेश : गुंठूर
स्वच्छ शहर (५० हजार ते ३ लाख लोकसंख्या)
१) मध्यप्रदेश : देवास
२) नवी दिल्ली महानगरपालिका
३) मध्यप्रदेश : सागर
स्वच्छ शहर (२० ते ५० लाख लोकसंख्या)
१) महाराष्ट्र : विटा (सांगली)
२) ओडीसा : आस्का
३) गोवा : पणजी
स्वच्छ शहर (२० हजार पेक्षा कमी लोकसंख्या)
१) छत्तीसगड :बिल्हा
२) महाराष्ट्र : पाचगणी
३) मध्यप्रदेश : बुधनी


