(मेलबर्न / वृत्तसंस्था)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामरिक भागीदारीला नवे बळ देणारे अनेक महत्त्वपूर्ण करार गुरुवारी करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यात झालेल्या द्विपक्षीय बैठकीनंतर शांततापूर्ण उद्देशांसाठी भारताला युरेनियम पुरवठ्याचा मार्ग मोकळा करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. याशिवाय नागरी अणुऊर्जा, सागरी सुरक्षा, महत्त्वपूर्ण खनिजे, सायबर सुरक्षा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि इंडो-पॅसिफिकमधील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर दोन्ही देशांनी शिक्कामोर्तब केले.
बैठकीनंतर भारत-ऑस्ट्रेलिया सुरक्षा संयुक्त घोषणापत्र, ऊर्जा सहकार्यावरील संयुक्त निवेदन तसेच सायबर सुरक्षा, क्रिटिकल टेक्नॉलॉजी आणि पुरवठा साखळी (Supply Chain) मजबूत करण्यासाठी नवीन सहकार्य आराखडा जाहीर करण्यात आला. नागरी अणुऊर्जा करारामुळे ऑस्ट्रेलियातून भारताला युरेनियमचा व्यावसायिक पुरवठा शक्य होणार असून, त्याचा भारतातील अणुऊर्जा प्रकल्पांना मोठा फायदा होणार आहे. यासोबतच प्रस्तावित सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य करार (CECA) आणि द्विपक्षीय गुंतवणूक संरक्षण करार अंतिम करण्यासाठी दोन्ही देशांनी चर्चेला गती देण्याचाही निर्णय घेतला.
स्वच्छ ऊर्जा क्षेत्राला नवी गती : मोदी
संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आज आम्ही अणुऊर्जा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारामुळे ऑस्ट्रेलियाकडून भारताला युरेनियम पुरवठ्याचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने भारताच्या वाटचालीला नवी गती मिळेल.” मोदी यांनी पुढे सांगितले की, महत्त्वपूर्ण खनिजांच्या क्षेत्रातील सहकार्यामुळे दोन्ही देशांची धोरणात्मक सुरक्षितता अधिक मजबूत होईल. याच पार्श्वभूमीवर सायबर सुरक्षा, क्रिटिकल टेक्नॉलॉजी आणि सप्लाय चेनसाठी ऑस्ट्रेलिया-भारत भागीदारी सुरू करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इंडो-पॅसिफिक आणि संरक्षण सहकार्याला प्राधान्य
दोन्ही देशांनी महत्त्वपूर्ण खनिज कॉरिडॉर विकसित करण्यासाठी संयुक्तपणे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी भारत-ऑस्ट्रेलिया संरक्षण नवोन्मेष कॉरिडॉर उभारण्यात येणार असून, त्याद्वारे संरक्षण क्षेत्रातील स्टार्टअप्स आणि उद्योगांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.
मोदी म्हणाले, “इंडो-पॅसिफिक हा केवळ दोन महासागरांचा संगम नसून समान विचारांच्या लोकशाही देशांच्या सामायिक आकांक्षांचे प्रतीक आहे. या प्रदेशात शांतता, स्थैर्य, नौवहन स्वातंत्र्य आणि नियमांवर आधारित व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया एकत्र काम करतील.”
दहशतवादाविरोधातील सहकार्य आणखी मजबूत
भारत-ऑस्ट्रेलिया सागरी सुरक्षा सहकार्य रोडमॅप जाहीर करत जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती आणि देखभाल क्षेत्रातही सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. दहशतवाद हा संपूर्ण मानवतेसमोरील गंभीर धोका असल्याचे नमूद करत मोदी यांनी दहशतवादाविरोधातील संयुक्त लढा अधिक प्रभावी करण्याचा निर्धार व्यक्त केला. जागतिक संघर्ष आणि तणाव संवाद व मुत्सद्देगिरीच्या माध्यमातूनच सोडवले जाऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भारताशी संबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत : अल्बानीज
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी भारतासोबतचे संबंध आजवरच्या तुलनेत अधिक भक्कम झाल्याचे सांगितले. ते म्हणाले, “अणुऊर्जेवरील करारामुळे शांततापूर्ण उद्देशांसाठी भारताला ऑस्ट्रेलियातून युरेनियम निर्यात सुलभ होईल. यामुळे स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढण्यास मदत होईल, तसेच ऑस्ट्रेलियाच्या संसाधन क्षेत्रासाठीही नवी बाजारपेठ उपलब्ध होईल.”
ते पुढे म्हणाले की, भारत-ऑस्ट्रेलिया सामरिक भागीदारीची सहा वर्षे पूर्ण होत असताना दोन्ही देशांमधील संबंध यापूर्वी कधीही इतके मजबूत नव्हते. आर्थिक, संरक्षण, ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य अधिक व्यापक करून द्विपक्षीय संबंधांना नवे बळ देण्यावर दोन्ही देशांचा भर राहील.

