(रत्नागिरी)
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आणि पोडार इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी आणि शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या माधुरी कळंबटे आणि पोडार इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य सौ. प्राजक्ती गायकवाड यांनी पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून सहभाग घेण्यास प्रेरित केले.
कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे बियाण्यांचे बॉल विद्यार्थ्यांना वितरित करणे. या बियाण्यांपासून झाडे लावून त्यांचे संगोपन करणाऱ्या विद्यार्थ्यांना एका वर्षानंतर प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरवण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले.
या कार्यक्रमाला पोडार स्कूलच्या प्राचार्य सौ. प्राजक्ती गायकवाड, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष श्री. रुपेश पेडणेकर, सचिव अॅड. मनिष नलावडे, खजिनदार माधुरी कळंबटे, प्रेसिडेंट इलेक्ट प्रमोद कुलकर्णी, सेक्रेटरी इलेक्ट रोहित विरकर, रोटरॅक्ट तन्वी साळुंखे आणि पोडार स्कूलचे शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोटरी इंटरॅक्ट क्लब ऑफ पोदार इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी सदस्य, शिक्षक अमोल शिवलकर सर, आर.व्ही. पाटील मॅडम आणि सपना साप्ते मॅडम यांचे मोलाचे योगदान लाभले.

