(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर आज, गुरुवारी (५ जून) जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम जयगड येथील जेएसडब्ल्यू (जिंदाल स्टील वर्क्स) कंपनीतर्फे आयोजित करण्यात आली होती. या कंपनीने गणपतीपुळे किनाऱ्याचे दत्तकत्व स्वीकारले असून, नियमितपणे येथे स्वच्छता उपक्रम राबविले जातात.
या उपक्रमांतर्गत, मान्सूनपूर्व संधीत समुद्रातून किनाऱ्यावर आलेला प्रचंड प्लास्टिक व सांडपाणीय कचरा, तसेच संरक्षण भिंतीलगत साचलेला कचरा पूर्णतः संकलित व विल्हेवाट लावण्यात आला.
यामध्ये जेएसडब्ल्यू कंपनीचे सुमारे 200 कर्मचारी व अधिकारी सक्रीय सहभागी झाले होते.
या उपक्रमामुळे गणपतीपुळे समुद्रकिनारा पुन्हा एकदा स्वच्छ व आकर्षक झाला असून, स्थानिक व्यावसायिक, पर्यटक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.