( गणपतीपुळे / वैभव पवार )
तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील समुद्र सध्या खवळलेला असून, मोठ्या प्रमाणावर उधाण आल्याने समुद्रकिनाऱ्यावर धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जयगड सागरी पोलिस ठाण्याच्या वतीने शनिवारी समुद्रकिनाऱ्यावर दोन ठिकाणी सूचना फलक लावण्यात आले आहेत.
या फलकावर “गणपतीपुळे समुद्र खवळलेला आहे. कृपया समुद्रकिनारी प्रवेश करू नका. पाण्यात जाऊन स्वतःचा व आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नये. आपला जीव आपल्या कुटुंबासाठी मौल्यवान आहे. सावधान रहा, सतर्क रहा.” अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
सध्या समुद्रात उधाणामुळे मोठमोठ्या लाटा उसळत असून, या लाटा थेट समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या संरक्षण भिंतीच्या पायऱ्यांवर आदळत आहेत. काही वेळा या लाटांचे पाणी थेट गणपतीपुळे मंदिर परिसरातील प्रसाद रांगांपर्यंत पोहोचत आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून ही सूचना दिली आहे.
जयगड सागरी पोलिसांनी पर्यटक व भाविकांना आवाहन केले आहे की, समुद्रकिनारी फिरताना विशेष काळजी घ्यावी आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. अनवधानाने घेतलेली जोखीम जीवावर बेतू शकते, याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

