( रत्नागिरी )
देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) व परीक्षा विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक (गृह विभाग) लेफ्टनंट कर्नल प्रशांत चतुर (निवृत्त) उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.
विशेष रोख रक्कम पारितोषिकांमध्ये विनय परांजपे यांच्यावतीने दिले जाणारे प्रा. एन. वाय. कुलकर्णी पारितोषिक (२०२५) मराठी विषयात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या तृतीय वर्ष कला शाखेतील दिव्या बिरप्पा निळे हिला प्रदान करण्यात आले. प्रा. शालिनी मेनन पारितोषिक (२०२५) अर्थशास्त्र विषयात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या ऋतिक जितेंद्र गुरव याला प्रदान करण्यात आले. प्रा. हरिप्रसाद शिवलाल लड्डा पारितोषिक (२०२५) वाणिज्य शाखेतील अकाउंट विषयात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या सिद्धी गजानन पवार हिला प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व अनुभव व्यक्त करत मनोगते मांडली. प्रमुख पाहुणे लेफ्ट. कर्नल प्रशांत चतुर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना कर्तृत्वशीलतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा मूलमंत्र दिला. विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने पुढे जगण्याचे, नव्या संधींना सामोरे जाण्याचे आणि देशाच्या विकासात मोलाचे योगदान देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा व महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास उपप्राचार्या प्रा. वसुंधरा जाधव, कला शाखेच्या प्रमुख प्रा. ऋतुजा भोवड, वाणिज्य शाखेच्या प्रमुख प्रा. राखी साळगावकर, विज्ञान शाखेचे प्रमुख प्रा. वैभव घाणेकर, तसेच प्राध्यापक आणि सर्व शाखांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक परीक्षा विभाग प्रमुख प्रा. विनय कलमकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. वैभव घाणेकर यांनी केले. प्रा. ऋतुजा भोवड यांनी आभार मानले.