( पुणे )
विवाहासाठी “जीवनसाथी” या मॅट्रिमोनी वेबसाइटवरून झालेली ओळख एका ४४ वर्षीय महिलेला चांगलीच महागात पडली आहे. स्वत:ला हर्ष भार्गव असे म्हणवणाऱ्या भामट्याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवत शेअर मार्केट शिकवण्याचे आमिष दिले आणि तिच्या नावावर बोगस आर्थिक व्यवहार करत तब्बल ११ लाख ७४ हजार रुपयांची फसवणूक केली. इतकेच नव्हे, तर त्यानंतर स्वत:चा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करत पसार झाला. या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फसवणुकीची नवी शक्कल
फिर्यादी महिलेने “जीवनसाथी” या विवाह संकेतस्थळावर प्रोफाईल तयार केली होती. त्यानंतर ‘हर्ष भार्गव’ नावाच्या व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला. ओळख वाढवत त्याने तिला लग्नाचे आमिष दिले आणि शेअर मार्केट शिकवतो, असे सांगून डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूरच्या नागपूर शाखेत खाते उघडण्यास भाग पाडले. संबंधित बँक खात्याला त्याने स्वत:चा मोबाइल नंबर लिंक केला. यानंतर वेळोवेळी विविध कारणे देत तिच्याकडून ११.७४ लाख रुपये या खात्यात ट्रान्सफर करून घेतले. इतकेच नव्हे, तर फिर्यादीच्या नावे मनपूरम गोल्ड लोन काढून १३.१९ लाख रुपयांचे सोने तारण ठेवले.
मृत्यूचा बनाव उघडकीस
एक दिवस त्याने परदेशात प्रोजेक्टसाठी जात असल्याचे सांगितले. काही दिवसांनी त्याच्या मित्राने संपर्क करून हर्षचा परदेशात अपघाती मृत्यू झाल्याची माहिती दिली. मात्र सात दिवसांपर्यंत तीच व्यक्ती महिलेशी चॅट करत राहिली. तिचे सांत्वन करत होती. मानसिक धक्क्यात असलेल्या महिलेने सुरुवातीला काही शंका आली नाही. मात्र, काही कालावधीनंतर तिने पुन्हा सगळी चॅट पुन्हा तपासली असता, त्याच स्पेलिंग मिस्टेक्स, तीच संवादशैली आणि त्याचे असे खोटे मृत्यूनंतरही सुरू असलेले संवाद पाहून तिला शंका आली. तिच्या लक्षात आले की हे चॅट करणारी व्यक्ती म्हणजे हर्षच होता. यानंतर तिने थेट पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.