(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
भारतीय जनता पार्टी नावडी गटाच्या माध्यमातून संगमेश्वर तालुक्यातील खाडीपट्टा व नावडी जि. प. गटातील महिलांसाठी लोवले येथील शुभगंधा मंगल कार्यालयात मंगळागौरी स्पर्धा व खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळागौरी स्पर्धेसाठी सात संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सादरीकरण केले तर पैठणीच्या खेळात १२० हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवून खेळाचा आनंद लुटला.
कार्यक्रमासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्र चव्हाण, खासदार श्री.नारायण राणे, मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा रत्नागिरीचे संपर्क मंत्री ना. नितेश राणे, भाजपा नेते श्री.प्रशांत यादव यांचीही साथ लाभली. तसेच भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. वर्षाताई ढेकणे, प्रदेश कार्यकारिणी सचिव सौ. शिल्पा मराठे, रत्नागिरी दक्षिण जिल्हा सरचिटणीस सौ. संगीता जाधव यांनी शुभेच्छा दिल्या.
रोजच्या व्यापातून महिलांनी स्वतःसाठी वेळ काढून आपली आवड व संस्कृती जपावी या हेतूने या स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामुळे अधिकाधिक महिलांचे एकत्रीकरण करण्याचे कार्य सौ. नुपुरा मुळ्ये यांच्या नेतृत्त्वाखाली सौ. सरिता आंबेकर, सौ. सुमन झगडे, सौ. प्रियंका साळवी, सौ. रोहिणी सुर्वे या महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांनी केले. प्रत्यक्ष कार्यक्रम राबवताना रत्नागिरी मध्य मंडळ तालुका सरचिटणीस राजेश आंबेकर व उन्मेष मुळ्ये यांचे विशेष सहकार्य लाभले.
कोळंबे येथील सौ. तेजस्विनी पडवळ खेळ पैठणीचा स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या तर ओझरखोलच्या सौ.राजश्री जठार यांनी उपविजेतेपद पटकावले. याशिवाय स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या ७ स्पर्धकांना विशेष भेट देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेदरम्यान लकी ड्रॉ काढण्यात आले. यातून ७ प्रेक्षकांनाही गौरवण्यात आले.
अमृता ग्रुप नावडी यांनी मंगळागौरी स्पर्धेच्या विजेतेपदावर सलग दुसऱ्या वर्षी आपले नाव कोरले. रत्नेश्वर कोळंबे भरणकरवाडी या संघाने द्वितीय तर अंतराळदेवी फुगडी ग्रुप कानरकोंड या संघाने तृतीय क्रमांक संपादन केला. याशिवाय केदारलिंग महिला मंडळ पडवळवाडी कोळंबे व हनुमान सेवा महिला मंडळ सुतारवाडी परचुरी यांना विशेष उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सहभागी सर्व संघांनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करून प्रोत्साहन देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी रत्नागिरी मध्य मंडलाचे तालुकाध्यक्ष प्रतिक देसाई, सरचिटणीस श्री. राजेश आंबेकर,तालुका उपाध्यक्ष श्री. सतीश पटेल, मा. जि. प. सदस्या दिपिकाताई जोशी, ज्येष्ठ कार्यकर्त्या माधवी भिडे, ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते प्रमोद शेट्ये, संगमेश्वर उत्तर मंडलाचे तालुका सरचिटणीस डॉ. अमित ताठरे, बंटी सुर्वे, राकेश खेऊर, ग्रामपंचायत डिंगणीचे उपसरपंच मिथुन निकम, लोवले बूथ अध्यक्ष मंगेश साळवी, तळेकांटे बूथ अध्यक्ष रविंद्र सांडीम, हेरंब भिडे आदी उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण रत्नागिरी येथील प्रसिद्ध नृत्यांगना कु. गौरी साबळे यांनी केले. सौ. नुपुरा मुळ्ये यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप केला.

