(खेड /रत्नागिरी प्रतिनिधी)
बोलेरो गाडीच्या हेडलाइटचा प्रकाश डोळ्यांवर पडल्याच्या कारणावरून झालेला वाद चांगलाच विकोपाला गेल्याची घटना खवटी येथे घडली. हेडलाइटच्या प्रकाशाबाबत विचारणा केल्याचा राग मनात धरून तरुणाचा पाठलाग करण्यात आला. त्यानंतर खवटी येथील एका हॉटेलमध्ये तरुणासह त्याच्या मित्राला हाताने तसेच प्लास्टिकच्या खुर्चीने मारहाण करण्यात आल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. या प्रकरणी अमोल दळवी (रा. पाखरवाडी, खवटी, ता. खेड) याच्यासह सहा ते सात अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभय गौतम धोत्रे (२३, रा. नातुनगर, वावे फाटा प्रकल्प वसाहत, बौद्धवाडी, ता. खेड) हे त्यांचा मित्र योगेश विटले यांच्यासह १४ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ८.५० वाजता बोरघर येथील चायनिज सेंटरसमोर गाडीवर बसले होते. त्यावेळी ए.पी. ०५०९ अशी क्रमांकाची पिवळ्या रंगाची नंबर प्लेट असलेली बोलेरो तेथे आली. या बोलेरोच्या हेडलाइटचा प्रकाश डोळ्यांवर पडल्याने धोत्रे यांनी चालकाला याबाबत विचारणा केली. त्यानंतर याच कारणावरून वाद निर्माण झाला. तक्रारीनुसार, संबंधितांनी धोत्रे यांचा पाठलाग केला. खवटी येथील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सुरुची हॉटेलच्या मुख्य प्रवेशद्वारापासून हॉटेलच्या आतील भागापर्यंत त्यांना आणि त्यांचा मित्र योगेश विटले यांना हाताने तसेच प्लास्टिकच्या खुर्चीने मारहाण करण्यात आली.
या मारहाणीत दोघांना दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच धोत्रे यांना शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी खेड पोलिसांनी अमोल दळवी याच्यासह सहा ते सात अनोळखी व्यक्तींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम १८९(२), १९१(२), १९०, ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सामान्य कारणावरून सुरू झालेला वाद पाठलाग, मारहाण आणि धमकीपर्यंत पोहोचल्याने या घटनेची परिसरात चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात एकापेक्षा अधिक व्यक्ती सहभागी असल्याचा आरोप असल्याने बेकायदेशीर जमावासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आता पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


