(खेड/ वार्ताहर)
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाकांक्षी खेड (जि. रत्नागिरी) ते महाबळेश्वर (जि. सातारा) मार्गावरील कोयना बॅकवॉटर परिसरातील तापोळे येथे उभारण्यात येत असलेल्या भव्य केबल स्टेड स्काय ब्रिजचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून, हा पूल पावसाळ्यानंतर वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांनी नुकतीच या सुरू असलेल्या प्रकल्पस्थळाला भेट देत कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीबाबत सविस्तर माहिती घेतली तसेच प्रकल्पाच्या तांत्रिक बाबींवर चर्चा केली.
हा स्काय ब्रिज कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना अधिक वेगवान व सुरक्षित संपर्क उपलब्ध करून देणार असून पर्यटन, व्यापार आणि स्थानिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. विशेषतः खेड, दापोली, चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटकांना महाबळेश्वरकडे जाण्यासाठी मोठा फायदा होणार आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोयना बॅकवॉटर परिसरातील पर्यटनालाही नवी ओळख मिळणार असून, भविष्यात हा स्काय ब्रिज राज्यातील प्रमुख पर्यटन आकर्षणांपैकी एक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यावेळी ॲड. वैभव खेडेकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे या प्रकल्पासाठी विशेष आभार मानले. राज्य सरकारच्या माध्यमातून कोकणातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
या पाहणी दौऱ्यावेळी भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अँड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, स्वराज गांधी, चंद्रकांत बनकर, प्रदीप भोसले, यश साळवी, ओवेस चौगुले तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

