( अहमदाबाद )
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची १८ वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. गेल्या १८ वर्षांपासून अनेकदा पराभव आणि थट्टेचा सामना करणाऱ्या आरसीबीने अखेर पहिल्यांदाच आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील संघाने रोमांचक फायनल सामन्यात पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव केला. यासह, आरसीबीने आयपीएल २०२५ च्या ट्रॉफीवर नाव कोरलं. कृणाल पंड्या, यश दयाल आणि भुवनेश्वर कुमार यांच्या संस्मरणीय गोलंदाजीच्या बळावर आरसीबीने १९० धावांचा यशस्वीरित्या बचाव केला. यासह, संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचं ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न साकार झालं.
आरसीबीने पंजाब किंग्सवर आयपीएलच्या फायनमलध्ये ६ धावांनी विजय साकारला आणि त्यांनी प्रथम विजेतेपदाला गवसणी घातली. यावेळी विराट कोहलीला अश्रू अनावर झाले. दुसरीकडे पंजाब किंग्जनेही आक्रमक फलंदाजी केली. एकानंतर एक फलंदाज परतत असताना शशांक सिंगने चांगलीच झुंज दिली. परंतु थोडक्यात पंजाब किंग्जला सामना गमवावा लागला.
आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना १९० धावा केल्या होत्या. आरसीबीच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात चांगली झाली. मात्र, त्यानंतर त्यांचे फलंदाज ठराविक फरकाने बाद होत राहिले. त्यामुळे हा सामना कोण जिंकेल, हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. पण आरसीबीने अचूक आणि भेदक मारा करत सामन्यावर वरचष्मा निर्माण केला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आरसीबीविरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएल २०२५ मधील अंतिम सामना रंगला.
कृणाल- भुवनेश्वरच्या गोलंदाजीने बजावली महत्त्वाची भूमिका
पंजाब किंग्सचा संघ फायनल सामन्यात १९१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरला, तेव्हा त्यांच्या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केली. मात्र, ४३ धावांवर त्यांना पहिला धक्का प्रियांस आर्याच्या (२४) रुपाने बसला. त्यानंतर प्रभसिमरन सिंग आणि जोश इंग्लिश यांनी डाव सांभाळला आणि स्कोअर ७२ धावांपर्यंत नेला. कृणाल पंड्याने प्रभसिमरनला बाद करत सामन्यात आरसीबीचे पुनरागमन केले. येथून पंजाब किंग्सला सामन्यात परत येण्याची संधीच दिली नाही.
श्रेयस अय्यर, ज्याच्याकडून या सामन्यात मोठ्या खेळीची अपेक्षा होती, तो केवळ एक धाव काढून बाद झाला. या सामन्यात कृणाल पंड्याने शानदार गोलंदाजी केली. त्याने चार षटकांत केवळ १७ धावा देत २ विकेट्स घेतले, ज्यामुळे सामन्यात निर्णायक फरक पडला. आरसीबीसाठी क्रुणाल व्यतिरिक्त भुवनेश्वर कुमारनेही २ विकेट्स घेतल्या, जो आपल्या कारकिर्दीत प्रथमच टी-२० फायनल सामन्यात विकेट्स घेण्यात यशस्वी ठरला.
या सामन्यात पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर निर्धारित २० षटकांत बंगळुरूने ९ बाद १९० धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यात पंजाबच्या काईल जेमिसन आणि अर्शदीप सिंगने प्रत्येकी ३ बळी घेत आरसीबीचे कंबरडे मोडले होते. यात बंगळुरूकडून विराट कोहलीने सर्वाधिक ४३ धावा जमवल्या, तर त्याला कर्णधार रजत पाटीदार (२६), जितेश शर्मा (२४), लियाम लिव्हिंगस्टन (२५), मयंक अग्रवाल (२४) या चौघांनी चांगली साथ दिली. त्यामुळे आरसीबीला १९० धावांपर्यंत मजल मारता आली. पंजाब किंग्जच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करीत आरसीबीला २०० च्या आत रोखले. त्यानंतर मैदानात उतरलेल्या पंजाब किंग्जची सुरुवात चांगली झाली. परंतु ठराविक अंतराने विकेट गमावल्याने पंजाबच्या संघ बॅकफूटवर आला तरीही शशांक सिंग अखेरपर्यंत झुंजला. परंतु त्याला पंजाबला विजय मिळवून देता आला नाही.