(कोलंबो)
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकातील सहाव्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तानवर विजय मिळवत स्पर्धेत सलग दुसरा सामना जिंकला. आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने ८८ धावांनी विजय मिळवला. यासह पाकिस्तानविरुद्ध भारताचा हा सलग बारावा वनडे विजय ठरला असून, पाकिस्तानला अद्याप भारताविरुद्ध एकदाही विजय मिळवता आलेला नाही.
भारताने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत २४७ धावा केल्या. त्यानंतर पाकिस्तानला २४८ धावांचे लक्ष्य गाठण्यात अपयश आले आणि संपूर्ण संघ १५९ धावांवर बाद झाला. परिणामी भारताने हा सामना ८८ धावांनी आपल्या नावे केला. या विजयासह भारत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला, तर पाकिस्तानला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला.
भारताची संघात्मक फलंदाजी
पाकिस्तानच्या कर्णधार फातिमा सना हिने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताच्या फलंदाजांनी सामूहिक खेळी करत २४७ धावांचा टप्पा गाठला.
संघाकडून — हरलीन देओल : ४६ धावा, ऋचा घोष : ३५ धावा, जेमिमा रॉड्रिग्स : ३२ धावा, प्रतिका रावल : ३१ धावा काढल्या तर पाकिस्तानकडून डियाना बेग हिने ४ बळी घेतले, तर सादिया इकबाल आणि फातिमा सना यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या.
पाकिस्तानची निराशाजनक फलंदाजी
२४८ धावांचे आव्हान पेलताना पाकिस्तानची फलंदाजी कोसळली. संघ केवळ ४३ षटकांत १५९ धावांवर बाद झाला.
संघाकडून फक्त सिदारा अमिन हिने उल्लेखनीय खेळी करत ८१ धावा केल्या, तर नतालिया परवेझ (३३) आणि सिदरा नवाज (१४) यांनी काहीशी झुंज दिली. भारताकडून क्रांती गौंड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले, तर स्नेह राणा हिने २ विकेट मिळवल्या.
हस्तांदोलन टाळले, तणावपूर्ण वातावरण
टॉसदरम्यान भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर आणि पाकिस्तानी कर्णधार फातिमा सना यांच्यात हस्तांदोलन झाले नाही. याळे सामन्यापूर्वीच वातावरण तणावपूर्ण बनले होते. सामन्यानंतरही दोन्ही संघांमध्ये शिष्टाचारापेक्षा अंतरच दिसून आले.
वनडे विश्वचषकातील पाचही सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानला हरवले आहे. एकूण १२ वनडे सामन्यांपैकी सर्व १२ भारताने जिंकले आहेत. या विजयासह भारताचा महिला विश्वचषकातील स्थान अधिक मजबूत झाले असून, संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे.

