(मुंबई)
मुंबई महानगरात प्रवेश करणाऱ्या हलक्या वाहनांना, शालेय बस व एसटी महामंडळाच्या बसेसना टोलमाफी देण्याचा निर्णय आता १७ सप्टेंबर २०२९ पर्यंत वाढवण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या टोल सवलतीचा कालावधी वाढवण्यास तसेच संबंधित टोल संकलन संस्थेला नुकसानभरपाई देण्यास मंजुरी देण्यात आली.
कोणत्या टोल नाक्यांवर सवलत लागू?
या टोल सवलतीचा लाभ १४ ऑक्टोबर २०२४ पासून पुढील पाच टोल नाक्यांवर लागू आहे:
-
वाशी टोल नाका – सायन–पनवेल महामार्गावर
-
मुलुंड टोल नाका – लालबहादूर शास्त्री मार्गावर
-
मुलुंड पूर्व टोल नाका – ईस्टर्न एक्सप्रेस वेवर
-
ऐरोली टोल नाका – ऐरोली पुलाजवळ
-
दहिसर टोल नाका – वेस्टर्न एक्सप्रेस वेवर
नुकसानभरपाई व टोल संकलन कालावधीबाबत निर्णय
या टोल सवलतीमुळे संबंधित एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीला करारातील तरतुदीनुसार नुकसानभरपाई देण्याची शिफारस मुख्य सचिवांच्या समितीने केली आहे. मूळ टोल वसुली कालावधी १९ ऑक्टोबर २०१० ते १८ नोव्हेंबर २०२६ होता. आता तो १७ सप्टेंबर २०२९ पर्यंत वाढवण्यात आला असून, १९ नोव्हेंबर २०२६ ते १७ सप्टेंबर २०२९ या वाढीव कालावधीदरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांची रिअल-टाइम प्रत्यक्ष गणनेचा डेटा उपलब्ध करून देणे अनिवार्य करण्यात आले आहे.
इतर महत्त्वाचे निर्णय
-
वाशी खाडी पूल प्रकल्प: पथकर सवलतीच्या भरपाईपोटी खाडी पूल क्र. ३ चा अंदाजे ₹७७५.५८ कोटींचा खर्च महामंडळाला रोख स्वरूपात टप्प्याटप्प्याने भरून काढण्यास मंजुरी.
-
उड्डाणपूल देखभाल जबाबदारी: मुंबई व उपनगर क्षेत्रातील २७ उड्डाणपुलांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडेच राहणार आहे.